January 16, 2021

‘मिशन उभारी’ अंतर्गत शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा

यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढून अशा कुटुंबांना मदत देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘मिशन उभारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हाधिका-यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन पाच प्रकरणे निकाली काढली.

यात यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त छगन उर्फ विठ्ठल श्रीहरी धारे, केळापूर तालुक्यातील जीरा येथील श्यामसुंदर टेकाम, घाटंजी येथील सुधीर रामटेके, कळंब तालुक्यातील देवनाळा येथील कवडू दाभेकर आणि नेर तालुक्यातील चिकणी डोमगा येथील विभिषण चव्हाण यांच्या प्रकरणांचा समावेश होता. शेतकरी आत्महत्या प्रकरणातील कुटुंबियांना शेतामध्ये नरेगा अंतर्गत विहिरी, तसेच काही कुटुंबांना शेतात पंप, जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप आदींचा लाभ द्यावा. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुध्दा सदर कुटुंबाना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. एका आठवड्याच्या आत संबंधित नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांनी सदर कुटुंबियांकडून सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत. यात कोणतीही चालढकल करू नये, अशा सुचना त्यांनी केल्या.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, पशुसवंर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. बी. आर. रामटेके यांच्यासह संबंधित गावांचे तलाठी, पोलिस पाटील, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *