पंतप्रधानांचा मोठा निर्णय … तर ठेवीदारांना तीन महिन्यात पैसे परत मिळणार

दिनांक :12-Dec-2021

नवी दिल्ली,
‘ठेवीदार प्रथम – गॅरंटीड टाईमबाऊंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट रु. 5 लाख’ या विषयावर आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ”आजचा दिवस बँकिंग क्षेत्रासाठी आणि देशातील करोडो बँक खातेधारकांसाठी महत्त्वाचा आहे. अनेक दशकांपासून चालत आलेल्या एका मोठ्या समस्येवर आज तोडगा निघाला आहे.”

पंतप्रधान म्हणाले, ”जुन्या कायद्यात सुधारणा करून एक मोठी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी ठेवीदारांचे बँकेत अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी कोणतीही मुदत नव्हती. आता सरकारने ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी 90 दिवसांचा म्हणजे 3 महिन्यांचा कालावधी बंधनकारक केला आहे. त्यामुळे बँक अडचणीत आल्यास ठेवीदारांना त्यांचे पैसे 90 दिवसांच्या आत परत मिळतील.”


पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या काही दिवसांत 1 लाखाहून अधिक ठेवीदारांचे अडकलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ही रक्कम सुमारे 1300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आज या कार्यक्रमात आणि त्यानंतरही अशा आणखी 3 लाख ठेवीदारांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. कोणताही देश वेळच्या वेळी समस्या सोडवू शकतो आणि त्या बिघडण्यापासून वाचवू शकतो, पण आपल्याकडे वर्षानुवर्षे समस्या आहे, ती पुढे ढकलण्याची प्रवृत्ती आहे. आजचा नवा भारत समस्या टाळत नाही तर समस्या सोडवण्यावर भर देतो.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ”याआधी ठेवीदारांना बँकेत अडकलेले स्वत:चेच पैसे मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागायची. निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेला या समस्येचा सामना करावा लागला. मात्रा आता ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने बदल आणि सुधारणा केल्या आहेत. आपल्या देशात, बँक ठेवीदारांसाठी विमा प्रणाली 60 च्या दशकात तयार केली गेली. यापूर्वी बँकेत जमा केलेल्या रकमेची केवळ 50,000 रुपयांपर्यंतच हमी होती, नंतर ती वाढवून 1 लाख करण्यात आली. आता ही रक्कम 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे.”

पंतप्रधानांनी सांगितले की, “आता कोणतीही बँक अडचणीत आली तर ठेवीदारांना 5 लाख रुपये नक्कीच मिळतील. यामध्ये सुमारे 98 टक्के खात्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ठेवीदारांचे 76 लाख कोटी रुपये पूर्णपणे सुरक्षित आहेत. असे सर्वसमावेशक सुरक्षा कवच विकसित देशांमध्येही नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *