October 16, 2021

शंभर दिवसात पगाराचा प्रश्न शंभर टक्के निकाली काढू – कपिल पाटील

शंभर दिवसात पगाराचा प्रश्न शंभर टक्के निकाली काढू – कपिल पाटील

प्रतिनिधी यवतमाळ:- अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील शिक्षक भारतीच्या उमेदवाराला निर्णायक मते देऊन आमदार बनवा. तुमची शंभर टक्के पगार देण्याची मागणी शंभर दिवसात निकाली काढून देतो असे आश्वासन शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांनी दिले आहे. ते यवतमाळ येथे प्रचारासाठी आले असता पत्रकार परीषदेत बोलत होते.

विना अनुदानीत शाळेतील शिक्षकांचा पगाराचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक शाळांना अनुदान नसून आता फक्त 20 टक्के अनुदान लागु करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांना सुध्दा अत्यल्प पगारात काम करावे लागत आहे. आता अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षक भारती कडून दिलीप निंभोरकर यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. निंभोरकर यांना शंभर टक्के मते देऊन विजयी करण्याचे आवाहन करीत कपिल पाटील यांनी शिक्षकांचे पगारासह विविध प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेले श्रीकांत देशपांडे हे शिक्षक विरोधी आहे. शिक्षकांचा लोक प्रतिनिधी हा शिक्षक विरोधी भूमिकेचे समर्थन करणारा नसावा. राज्यातील शिक्षकांना पगार हा कायदयाने मिळतो. सरकारने मात्र शिक्षकांचा पगार शासनाच्या धोरणाने ठरेल अशी अधिसुचना जारी केली होती. या अधिसुचनेचे श्रीकांत देशपांडे यांनी समर्थन केले होते. आम्ही त्याचा विरोध करुन ही अधिसुचना मागे घेण्यास सरकारला भाग पाडल्याचे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे सांगीतले. याव्यतिरीक्त आनखी एक अधिसुचना जारी करुन दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी रुजू झालेल्या काही शिक्षकांच्या पेन्शन वर गदा आनण्यात आली होती. हा निर्णय सुध्दा मागे घेण्यास शिक्षक भारतीने सरकारला भाग पाडले. या अशा निर्णयाचा श्रीकांत देशपांडे यांनी कुठलाच विरोध न केल्याने देशपांडे यांनी त्या निर्णयाचे सुध्दा समर्थनच केल्याचे आम्ही मानतो असेही सुभाष मोरे यांनी सांगीतले. शिक्षकांना उपचारासाठी सरकारकडून नंतर पैसे मिळतात आम्ही मात्र कॅशलेस सुविधा शिक्षकांना उपलब्ध करुन दिली आहे. यासारखेच शिक्षकांसाठी  चांगले निर्णय घेण्यासाठी दिलीप निंभोरकर यांना निवडून देण्याचे आवाहन कपिल पाटील यांनी केले. पत्रकार परीषदेला दिलीप निंभोरकर, अतुल देशमुख राष्ट्र सेवादल राष्ट्रीय सचिव, सुभाष मोरे कार्याध्यक्ष शिक्षक भारती, संदीप तडस राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती, साहेबराव पवार जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती, धम्मा कांबळे प्रजासत्ताक शिक्षक संघ, गजानन पवार, संजय म्हस्के, पुरुषोत्तम ठोकळ, संजय गुजर, राजेन्द्र जोगमोडे, प्रकाश साबळे, सुभाष गवई, नंदलाल राठोड उपस्थित होते.

नविन शिक्षण धोरण घातक

केन्द्र सरकारचे नविन शिक्षण धोरण गरीब, बहुजन विद्यार्थ्यांसाठी घातक आहे. या धोरणामुळे देशभरात असलेल्या 5 लाख शाळेपैकी 1 लाख शाळा बंद होतील. याव्यतिरीक्त देशभरात असलेल्या 50 हजार महाविद्यालयांपैकी जवळपास 35 हजार महाविद्यालये बंद होतील. शिक्षण क्षेत्रात सरकारने खासगीकरण तसेच व्यापारीकरणाला अनिर्बंध मुभा दिली आहे्. या धोरणाला आम्ही कडाडून विरोध करीत असल्याचे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed