जिल्ह्यातून सकारात्मक ऊर्जा घेऊन जातोय – दौलत दरोडा

 

प्रशासनाच्या कामावर समितीने व्यक्त केले समाधान

यवतमाळ, दि 22 (जिमाका):- आदिवासी जनतेच्या उत्कर्षासाठी शासनाच्या सर्व विभागाच्या योजना राबविण्याकरिता क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी हे क्रियाशील राहतील याची काळजी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी घ्यावी. शिवाय जिल्ह्यातील सर्व विभागाच्या पदभरती संदर्भात संविधानाने ठरवून दिलेल्या चौकटीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देतांनाच या जिल्ह्यात चांगल्या आश्रमशाळा सुद्धा पाहायला मिळाल्या, त्यामूळे या जिल्ह्यातून आम्ही सकारात्मक ऊर्जा घेऊन जातोय, असे उद्गार विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार दौलत दरोडा यांनी काढले.

अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होती. पहिल्या दिवशी सर्व विभागांची विविध विषयांवर आढावा बैठक, दुसऱ्या दिवशी योजना व विकास कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणीची गावात पाहणी करून आज तिसऱ्या दिवशी समितीने पुन्हा उर्वरित कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे घेतला. यावेळी श्री. दरोडा बोलत होते.

बैठकीला समिती सदस्य आमदार अशोक उईके, आमदार किरण सरनाईक, आमदार राजकुमार पटेल, आमदार भिमराव केराम, आमदार शिरीष चौधरी, आमदार राजेश पाडवी, आमदार रमेशदादा पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव मोहन काकड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ- पाटील, आदिवासी विकास विभाग अमरावती चे अप्पर आयुक्त सुरेश वानखेडे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प पांढरकवडा कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसदचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी समिती सदस्यांनी गैरआदिवासींनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यात. पेसाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामाचे ऑडिट करून अहवाल सादर करावा, जुन्या आश्रम शाळांना नवीन इमारती बांधून द्याव्यात, कुमारी मातांसाठी स्वतंत्र वसाहत निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, जिल्ह्यात पदभरती करताना संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने नोकर भरती करावी, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांची तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्हे प्राधान्याने तपासावर घ्यावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. समितीने विचारलेल्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तरे दिली याबाबत अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.

कोरोना कालावधीत आरोग्य विभागाने चांगले काम केले असून आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, नर्स, डॉक्टर या सर्वांच्या कामाचे समितीने कौतुक करून अभिनंदनही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *