सक्षम व सर्वसामान्य लोकांशी बांधिलकी असलेल्या लोकप्रतिनिधीची गरज माजी खासदार डॉ. विजय दर्डा.
आम्हाला सत्ता हवी ती या भागाच्या विकासासाठी डॉ . विजय दर्डा.
योग्य नियोजन करून शहराचा कायापालट करू.
यवतमाळ :- मागील दहा वर्षात यवतमाळची दुरवस्था झाली आहे. विकास कामे रखडली आहेत. वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न चिंता निर्माण करणारा आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर यवतमाळला सक्षम व सर्वसामान्य लोकांशी बांधिलकी असलेल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे, हे सर्व गुण बाळासाहेब मांगूळकर यांच्यात आहेत. सतत लोकांमध्ये राहणाऱ्या बाळासाहेबांना इथल्या प्रश्नांची जाणीव आहे. शिवाय बाळासाहेब कोणासमोर झुकणार नाहीत आणि विकले जाणारही नाहीत, याची गॅरंटी आहे. आमची बांधिलकी या भागाच्या विकासासोबत आहे. यवतमाळला विकसित पहायचे असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब मांगूळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असे आवाहन माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांनी केले.
शहरातील रुक्मिणी मंगल कार्यालयात शुक्रवारी सकल बंजारा समाजाची सहविचार सभा पार पडली. या प्रसंगी डॉ. दर्डा बोलत होते. मंचावर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब मांगूळकर, तेलंगणातील खासदार डॉ. रवी मल्लूजी, आमदार डॉ. राजेश रेड्डी, आमदार वामशी कृष्णा, माजी आमदार कीर्ती गांधी, ऑल इंडिया कॉग्रेस कमिटीचे सदस्य भरत राठोड, जय सेवालाल संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष श्रावण पवार, अॅड. सीमा तेलंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड होते. यवतमाळला ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा, देवराव पाटील, उत्तमराव पाटील यांच्यासारखे व्यापक नेतृत्व मिळाले. त्यांनी या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. सद्यस्थितीत मतदारसंघाला या भागाचा अभ्यास असणाऱ्या तळमळीच्या नेतृत्वाची गरज आहे. आज यवतमाळमध्ये पायाभूत सुविधांची उणीव प्रकर्षाने जाणवते आहे. शहराला स्वच्छ व पुरेसे पाणी मिळण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्यही चांगले राहते. मात्र, शहरातील अनेक भागांना आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही. या प्रकाराची लाज वाटते, अशा शब्दात डॉ. दर्डा यांनी संताप व्यक्त केला. नेतृत्वाला या भागातील जनतेबाबत प्रेम-जिव्हाळा – असेल तरच तो काम करू शकतो. बाळासाहेब मांगूळकर हे सतत लोकांमध्ये राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. भले त्यांच्याकडे पैसा नसेल मात्र, आपणा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. ते या भागाचे सक्षम नेतृत्व करू शकतात, असा विश्वास आहे.
स्व. जवाहरलालजी दर्डा यांनी तरुणांना रोजगार मिळावा म्हणून यवतमाळला एमआयडीसी उभारली. ओरिएन्ट सिन्टेक्स, हिंदुस्थान लिव्हरसारखे मोठे उद्योग पाठपुरावा करून येथे आणले. मात्र या कंपन्या आता बंद पडल्या आहेत. मी हात जोडले नसते तर रेमंडसारखा उद्योगही यवतमाळमधून गेला असता. या सगळ्या मुद्द्यांचा यवतमाळकरांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्हाला सत्ता हवी ती या भागाच्या विकासासाठी. या भागातील लोकांच्या हाताला काम देण्यासाठी. आज यवतमाळमध्ये कोण सुरक्षित आहे. मुलांच्या हातात गांजा, चाकूसारख्या वस्तू दिसू लागल्या आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. दुसरीकडे कापूस, सोयाबीन या शेतमालाचा उत्पादन खर्चही निघत नाही. ही सर्व परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला यवतमाळमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. बाळासाहेब मांगूळकरसारख्या सच्च्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवा, या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मी तुम्हाला देतो, असेही डॉ. विजय दर्डा म्हणाले.