स्वच्छ, सुंदर, भयमुक्त आणि विकसनशील यवतमाळ घडविण्यासाठी मतदान करावे, डॉ विजय दर्डा.
स्वच्छ, सुंदर, भयमुक्त आणि विकसनशील यवतमाळ घडविण्यासाठी मतदान करावे.
यवतमाळ : स्वच्छ, सुंदर, भयमुक्त आणि विकसनशील यवतमाळ घडविण्यासाठी मतदान करावे. आज या शहरात आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. गुन्हेगारीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुले नशेच्या आहारी जात आहेत. हे चित्र बदलविण्यासाठी प्रत्येकाने विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांनी केले. ते यवतमाळातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या स्नेहमिलन सभेत बोलत होते.
यवतमाळच्या गतिशील विकासासाठी येथे रेल्वे आणि विमानसेवा महत्त्वाची आहे. रेल्वेचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु, त्याला अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला नाही. माझे एकाकी प्रयत्न सुरू आहेत, असे डॉ. विजय दर्डा यांनी सांगितले. यवतमाळात मागील दहा वर्षांत एकही नवा उद्योग आला नाही. येथील तरुणांच्या हातांना रोजगार नाही. यामुळे बेरोजगारी व त्यातून गुन्हेगारी तयार झाली आहे. या शहरात ओरिएन्ट सिन्टेक्स, हिंदुस्थान लिव्हर हे दोन मोठे प्रकल्प आले आणि बंद पडले. आता रेमंड चाही प्रकल्प बंद करण्याची घोषणा वारंवार होत आहे, मात्र प्रशासनाला वारंवार विनंती करून हा उद्योग येथेच सुरू राहावा. असा आग्रह धरला. याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नवे उद्योग आणण्यासाठी विमानसेवा सुरू करणे आवश्यक आहे. विमानसेवा असल्यास काही ठरावीक लोकांचाच फायदा होतो, असे नाही. शहरात मोठे उद्योग आणता येतात. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते. यवतमाळात एकमेव प्रियदर्शिनी सूतगिरणी सुरू आहे. ती सुरू करताना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतले. यातून येथे रोजगार उभा केला. आता बँकेच्या कर्जाची परतफेडही करण्यात आली आहे.
यवतमाळ शहर शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हावे यासाठी १९ एप्रिल १९५९ रोजी अमोलकचंद विज्ञान महाविद्यालयाची सुरुवात केली. त्यावेळी विज्ञान शाखेला ३६ विद्यार्थी होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, विनोबा भावे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्रामसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींनी या महाविद्यालयाचे लोकार्पण केले. यावेळी पंडितजींनी हे महाविद्यालय विद्यापीठात सर्वांत मोठे महाविद्यालय म्हणून नावारूपास येईल, असे भाकीत केले होते. आज ती बाब तंतोतंत खरी ठरली आहे.
यवतमाळच्या मातीबद्दल मला नेहमीच आकर्षण राहिले आहे. शाळा, महाविद्यालय यांचा विस्तार पुणे, मुंबईसारख्या शहरांतही सहज करता आला असता; परंतु, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलांना दर्जेदार व किफायतशीर शिक्षण मिळावे यासाठी माझे कायम प्राधान्य राहिले आहे. दिल्ली, मुंबई, नागपूर येथील माझ्या घरांचे नावही ‘यवतमाळ हाऊस’ ठेवले आहे. त्यामुळे कायम या शहराच्या व जिल्ह्याच्या विकासाचा विचार घेऊन मी काम करीत असतो. आपण विधानसभेच्या निवडणुकीत बाळासाहेब मांगुळकर यांना मतदान करून विकसित यवतमाळसाठी सहकार्य करा, असे आवाहन डॉ. विजय दर्डा यांनी केले.