राज्य सरकार गुजरातसाठी काम करणारे सरकार – नाना पटोले
राज्याचे प्रमुख हे जनतेचे हस्तक असतात. मात्र, आपल्या मुख्यमंत्र्यांनी ते प्रधानमंत्री तसेच गृहमंत्र्यांचे हस्तक असल्याचे जाहीरपणे कबूल केले आहे. त्यांच पद्धतीने ते काम करीत आहे. राज्यातील तरुण बेरोजगार होत असताना प्रकल्प गुजरातला पाठविल्या जात आहे. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
यवतमाळ :-भारत जोडो यात्रेच्या निमीत्ताने यवतमाळात आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके, जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल मानकर, तातू देशमुख, देवानंद पवार, बाळासाहेब मांगुळकर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, प्रा. प्रविण देशमुख, जीवन पाटील, मनीष पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पटोले म्हणाले की, देशाचे संविधान धोक्यात आले आहे. ते वाचविण्यासाठी काँग्रेस नेते राहूल गांधी भारत जोडो यात्रा करीत आहे. या यात्रेला तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश आता तेलगंणा राज्यात नागरिकांचा पाठिंबा मिळाला आहे. देश संकटात असताना महाराष्ट्र हे नेहमीच देशरक्षणासाठी धावून गेला आहे. आताही तशीच स्थिती आहे. त्यामुळे राहूल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठा जनसमुदाय याठिकाणी त्यांचे सोबत असणार आहे. राज्यातले सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करीत आहे. विरोधकांचा धसका घेत यात्रांना परवानगी नाकारण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही पटोले यांनी राज्य सरकारवर केला. प्रकल्प शहरातून गेल्याने नागपूरात तरुणांनी आंदोलक केले. त्यावर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना ‘शेबडे’म्हणून हिणविले. विरोधकांबाबत त्यांचे नेते अपशब्द वापरतात, हीच भाजपची खरी संस्कृती असल्याचेही पटोले म्हणाले. राज्यातील मुळ प्रश्न जनतेसमोर येऊ नये म्हणून सत्ताधारी आमदार भांडतात हे त्यांचे डावपेच आहे. जनतेच्या मनात भाजपविरोधात मोठा रोष आहे. त्यांच्या प्रत्यत भारत जोडो यात्रेतून येत आहे. लाखो तरुण या पदयात्रेत सहभागी झाले आहे. राज्यातूनही मोठा पाठिंबा यात्रेला मिळणार असल्याचे पटोले म्हणाले.
……………….
त्यांनी त्यांचे घर सांभाळावे
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे 22 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे विधान केले होते. यावर प्रश्न विचारल्यानंतर सत्तेत असताना आपले आमदार त्यांना सांभाळता आले नाही, त्यांनी आधी आपले घर सांभाळावे असा टोला नाना पटोले यांनी खैरे यांना लगावला. आमचा एकही नेता, आमदार भाजपसोबत जाणार नसल्याचे सांगीतले.
……………………
” गिधाड्याचा शापाने गाय मरत नाही “
जे आज भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी आहेत, ते भविष्यात दिसणार नाही असे विधान केले होते. याला उत्तर देतांना पटोले म्हणाले की, गिधाड्यांच्या शापाने गाय मरत नाही अशी मराठीत म्हण आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाकडे आम्ही लक्ष देत नाही.