यवतमाळात नाना पटोले यांची प्रतिकात्मक भारत जोडो यात्रा
कॉग्रेसचे अनेक पदाधिकारी झाले सहभागी
यवतमाळ :- भारताचे संविधान वाचविण्यासाठी, विविध जाती धर्मातील नागरीकांची आपसातील कटुता कमी करण्यासाठी कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. याच यात्रेच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आलेल्या कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज यवतमाळात पहाटे 5 वाजता प्रतिकात्मक भारत जोडो यात्रा काढली. पुर्वतयारी साठी काढण्यात आलेल्या यात्रेत कॉग्रेसचे मोठया प्रमाणात पदाधिकारी सहभागी झाले.
भाजपाचे केन्द्रातील सरकार भारताचे संविधान बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हे तर जाती-धर्मात तेढ निर्माण करुन सत्ता टिकविण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरु आहे. विविध जाती तसेच धर्माचा हा भारत देश अखंड राहावा यासाठी तसेच नागरीकांना जागृत करण्यासाठी कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे.
त जवळपास साडेतीन हजार किलोमिटर पदयात्रेत चालणार आहे. या यात्रेच्या पुर्वतयारीचा आढावा नाना पटोले यांनी काल घेतला. यवतमाळ जिल्हयातून सुध्दा हजारोच्या संख्येत कार्यकर्ते, पदाधिकारी या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी रोज जवळपास 20 ते 25 किलोमिटर पायी चालतात. सकाळी पाच वाजता ही पदयात्रा सुरु होते. त्यामुळे नाना पटोले यांनी सुध्दा पदाधिका-यांची चालण्याची तयारी असावी या उद्देशाने आज पहाटे 5 वाजता शासकीय विश्राम गृहापासून पदयात्रेची रंगीत तालीम सुरु केली. यामध्ये आवाहन केल्यानुसार मोठया प्रमाणात पदाधिकारी सहभागी झाले होते. नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री वसंतराव पुरके, देवानंद पवार, प्रफुल मानकर, प्रविण देशमुख, अरविंद वाढोनकर, अशोक बोबडे, मनिष पाटील, चंदु चौधरी, नदीम यांच्यासह घाटंजी, राळेगाव, पुसद भागातील पदाधिकारी, यवतमाळचे नगरसेवक या यात्रेत सहभागी झाले होते. विश्रामगृहापासून निघालेली ही पदयात्रा अमोलकचंद महाविदयालय तसेच नेहरु स्टेडीअम मध्ये सात ते आठ राऊंड मारुन पुन्हा विश्राम गृह येथे आल्यानंतर विसर्जीत झाली.