बुलेटच्या १०२ सायलेन्सरवर फिरविला बुलडोझर
बुलेटच्या १०२ सायलेन्सरवर फिरविला बुलडोझर
३८८ चालकांना तब्बल चार लाखांचा दंड
कर्कश आवाज झाला बंद
यवतमाळ – गैरकायदेशीररीत्या बुलेटला कर्कश आवाज येणारे सायलेन्सर बसवून शहरात टवाळखोरी करण्याचा ट्रेंड शहरात आहे. त्याचा वृध्द, नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतो. यावर आता कायमस्वरूपी तोडगा काढीत जिल्हा वाहतूक शाखेने मोहिम उघडली आहे. त्यामध्ये बुधवार, २३ ऑक्टोबरला तब्बल १०२ कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर बुलडोझर फिरविण्यात आला. तसेच आत्तापर्यंत ३८८ बुलेट चालकांना तब्बल तिन लाख ९५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला.
बुलेटसोबत आलेले कमी आवाजाचे सायलेन्सर बदलवून कर्कश आवाजाचे लावण्याचे फॅड सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही याचे लोण पसरले आहे. त्यामुळे
ध्वनिप्रदूषण होत आहे. या प्रकाराच्या अनेक तक्रारी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांच्या कानापर्यंत पोहोचल्या होत्या. नियम मोडणाऱ्या बुलेट चालकांवर मोटर वाहन कायद्याने कारवाई करीत एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा अधिकार वाहतूक विभागाला आहे. कारवाई झालेला बुलेट चालक पुन्हा नियम पायदळी तुडवितांना आढळल्यास त्याला दुप्पट दंड ठोठावण्याचे अधिकारही आहेत. त्यातून जिल्हा वाहतूक शाखेने आतापर्यंत ३८८ बुलेट त्यांच्याकडून तीन लाख ९५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच कर्कश आवाज करणारे १०२ सायलेन्सर जप्त सुद्धा करण्यात आले होते. जप्तीतील १०२ सायलेन्सरवर नागपूर बायपास मार्गावर बुलडोझर फिरवित नष्ट करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, जिल्हा वाहतूक अधिकारी अजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.