बसमध्ये चढताना ४९ हजारांची रोकड उडविली
बसमध्ये चढताना ४९ हजारांची रोकड उडविली
यवतमाळ – बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाच्या चोरखिशातून ४९ हजार रुपयांची रोकड उडविली. ही घटना बुधवारी दुपारी १२:५० वाजण्याच्या दरम्यान बसस्थानकात घडली.
महेंद्र नथ्थूजी पचकटे (वय ६१, रा. स्नेहलनगर, खामगाव, जि. बुलढाणा) असे फिर्यादीचे नाव आहे. ते सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांचा भाऊ सावंगी मेघे येथील रुग्णालयात भरती आहे. त्याच्या उपचारासाठी ४९ हजार रुपयांची रोकड घेऊन जात होते. खामगाव येथून आल्यावर यवतमाळच्या बसस्थानकात उतरले. सावंगी मेघे येथे जाण्यासाठी यवतमाळ ते नागपूर बस (एमएच १४ -बीटी ५०१७) मध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरखिशात ठेवलेली रोकड उडविली. बसच्या दोन पायऱ्या चढल्यावर चोरीची ही घटना लक्षात आली.याप्रकरणी महेंद्र पचकटे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. एका आठवड्यात रोकड उडविल्याची ही दुसरी घटना घडली आहे. बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, पूर्ण वेळ पोलिस चौकी सुरू करण्यात यावी, चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.