वंचित बहुजन आघाडी च्या वतीने २३ मार्च रोजी नागपूर येथे संघ मुख्यालयावर मोर्चा.
यवतमाळ प्रतिनिधी.
देशात जातीचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप – ॲड प्रकाश आंबेडकर.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी १६ मार्च रोजी यवतमाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, भाजप व आर एस एस वर जोरदार टीका केली. देशातील विविध घडामोडींवर भाष्य करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
देशात जातीचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले, “ज्यांना वाटते की नरेंद्र मोदी देशात जातीचे वर्चस्व निर्माण करतील, त्यांनी हे लक्षात घ्यावे की देश आता समतेच्या मार्गावर चालू लागला आहे. हा प्रवास आता कुणीही थांबवू शकणार नाही.” खोट्या स्वप्नांच्या आहारी जाऊन देश पुन्हा गुलामीकडे नेला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील चर्चेची माहिती देताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर अमेरिकेचा प्रभाव असल्याचा आरोप करत “मोदी हे ‘मुद्रा मॅन’ वरून ‘मुजरा मॅन’ झाले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी एपस्टीन प्रकरण, देशातील वाढती अराजकता, गॅस टंचाई आणि खत टंचाई या मुद्द्यांवरही भाष्य केले. देशातील परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी च्या वतीने २३ मार्च रोजी नागपूर येथे असलेल्या संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. “देशात एवढी अस्थिरता आणि अराजकता असूनही तुम्ही नरेंद्र मोदींचा राजीनामा का मागत नाही?” असा जाब या मोर्चाच्या माध्यमातून संघाला विचारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

