पत्नीच्या सत्कार सोहळ्यात पतीचा मृत्यू

यवतमाळ प्रतिनिधी :- प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या पत्नीचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात सुरू असतानाच अचानक त्यांच्या पतीला भोवळ आली आणि सर्वांच्या डोळ्यादेखत त्यांचे निधन झाले. शेकडो उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा हा प्रसंग गुरुवारी दुपारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात घडला.
विकास महाजन (रा. आर्णी नाका परिसर, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पत्नी डाॅ. रेखा महाजन या गेल्या काही वर्षांपासून येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डायट) प्राचार्य होत्या. ३१ मार्च रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त कर्मचाऱ्यांनी गुरुवारी त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी डाॅ. रेखा महाजन व त्यांचे पती निवृत्त कृषी अधिकारी विकास महाजन या दोघांच्या हस्ते जिल्ह्यातील पीचएडी प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विकास महाजन यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शनपर भाषणही केले. भाषणानंतर ते मंचावर बसलेले असतानाच अचानक भोवळ येऊन ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
यावेळी महाजन दाम्पत्याच्या दोन मुली, मुलगा कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे, आजी आजोबांचा सत्कार पाहण्यासाठी त्यांची नातवंडेही आली होती. मात्र सत्काराच्या आनंद सोहळ्यात सर्वांच्या डोळ्यादेखत विकास महाजन यांचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण ‘डायट’ची यंत्रणा आणि महाजन परिवार शोकसागरात बुडाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed