‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’
बालदिनी विद्यार्थ्यांनी दौड करीत यवतमाळात जागर.
परिपक्च लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदानास पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकाने मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे व त्याकरिता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी केले.
यवतमाळ : विधानसभा क्षेत्रातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून यवतमाळ विधानसभा क्षेत्राने गुरुवारी मॅरेथॉन दौडचे आयोजन केले होते. यात विविध शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करत गेलेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांनी मतदारांना जागृत करण्यासाठी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, असे म्हणत मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले.
स्थानिक नेहरू स्टेडियमवरून या मॅरेथॉन रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी घनशाम राठोड, स्वीप नोडल अधिकारी रूपाली बेहरे, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर गोळे,नगर परिषद मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, प्रशासन अधिकारी विनोद डवले होते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, धावपटू, क्रीडापटू, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक-शिक्षिका, महसूल कर्मचारी व नगर परिषद कर्मचारी बहुसंख्येने या रॅलीत सहभागी झाले. शहरातील तहसील चौक, शारदा चौक, कळंब चौक, पाटीपुरा, माळीपुरा, अप्सरा चौक, मेनलाईन, पाच कंदील चौक मार्गे नेहरू स्टेडियम येथे रॅलीची सांगता झाली. मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी न.प. च्या प्रिया थुल, सर्वश्री घोती, नागेश कपाटे, प्रेमेंद्र रामपूरकर, देशमुख सर, संजय बट्टावार,आदींनी परिश्रम घेतले.