वीज पडून २२ बकऱ्यांचा मृत्यू; शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर
वीज पडून २२ बकऱ्यांचा मृत्यू; शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर
वरुड (ता. मारेगाव), १८ मे– मारेगाव तालुक्यातील वरुड शिवारात वीज पडून २२ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना सायंकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास कवडू जुमानके यांच्या शेतात घडली.
भारत तुकाराम गेडाम (वय ५५) रा. वरुड हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. अचानक वातावरणात बदल होऊन अंधार पसरला आणि बकऱ्या पळस झाडाखाली आश्रय घेत असताना जोरदार वीज कोसळली. या विजेच्या झटक्याने भारत गेडाम यांच्या २२ बकऱ्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. हे दृश्य पाहून भारत गेडाम यांना जागीच चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले.
थोडा वेळानंतर त्यांना शुद्ध आली आणि ते कसेबसे घराकडे गेले. ही घटना कुटुंबियांना सांगितल्यावर त्यांना तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे यांनी रुग्णालयात भेट दिली. तहसीलदार निलावाड यांनी शासन निर्णयानुसार शक्य ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन भारत गेडाम यांना दिले.
भारत गेडाम हे शेळीपालन करून उदरनिर्वाह करत असून, ही हानी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा आघात करणारी आहे. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.