संस्कार भारती यवतमाळच्या उन्हाळी कला क्रीडा शिबिराचा समारोप


मुलं सृजनानंदात रममाण होणं हा पालकांसाठी महत्त्वाचा क्षण – डॉ. अनिल आखरे.

आजच्या काळात मुले असो वा मोठे, सर्वांचा मोबाईल, टीव्ही कम्प्युटर इत्यादी स्क्रीनवर बहुतांश वेळ जातो. स्क्रीनच्या अतिवापरामुळे केवळ शरीर अथवा मनावरच दुष्परिणाम होतो असे नाही तर आपण आपली सृजनशीलता हरवू लागलो आहोत. मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवायचे हे पालकांपुढे आव्हान असते. संस्कार भारतीच्या कला क्रीडा शिबिरामुळे पालकांना आपली मुले कलेमध्ये रममाण होताना दिसत आहेत. हा सृजनानंद म्हणजे सर्वात महत्त्वाचा क्षण होय, असे प्रतिपादन यवतमाळातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अनिल आखरे यांनी येथे केले.

संस्कार भारती यवतमाळच्या उन्हाळी कला क्रीडा शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष आनंद कसंबे, प्रांत महामंत्री विवेक कवठेकर, शाखाध्यक्ष डॉ. ताराचंद कंठाळे व मंत्री अपर्णा शेलार प्रामुख्याने उपस्थित होते.

दिनांक 6 ते 17 मे 2025 दरम्यान येथील शंकरलाल कोठारी विद्या मंदिरात संपन्न झालेल्या या शिबिरामध्ये मुलांनी खेळांसोबतच समूहगान, समूहनृत्य, हस्तकला, चित्रकला, मूर्तिकला, बालनाट्य, वारली चित्र इत्यादी कलाप्रकारांमध्ये रममाण होण्याचा आनंद घेतला. त्यांना जितेंद्र सातपुते, कमलेश मुंदेकर, तन्मय गोडे, भक्ती जोशी, प्राची बनगीनवार, स्वाती बनसोड, डाॅ. ललिता घोडे, सदानंद देशपांडे, अरुण लोणारकर, संजय सांबजवार, सचिन मानेकर, प्रदीप गज्जलवार, शीतल बोंद्रे, शिल्पा कवठेकर, आयुषी कार्लेकर, छाया लोणारकर, रेखा कंठाळे, चंद्रशेखर सवाने, शेखर वांढरे, महेश अडगुलवार यांनी मार्गदर्शन केले.

मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन यावेळी एका कक्षात भरवण्यात आले होते. याच वेळी सुप्रसिद्ध चित्रकार, रांगोळीकार अरुण लोणारकर व संजय सांबजवार यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा पराक्रम दर्शविणारी अप्रतिम पोर्ट्रेट रांगोळी चितारली होती.

या रांगोळी प्रदर्शनीस ‘सक्षम’चे आशुतोष देशपांडे, संजय दंडे, ‘सेवा समर्पण’चे प्रशांत बनगीनवार, अनंत कौलगीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन अवलोकन केले.

समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या गायन, नृत्य व नाट्यकलेचे प्रदर्शन करून उपस्थित पालकांनादेखील आनंदित केले. याप्रसंगी शिबिरातील महत्त्वाचे क्षण टिपणारी, आनंद कसंबे निर्मित चित्रफित दाखवण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन शिबिर सहसंयोजक साक्षी काळे यांनी तर प्रास्ताविक संस्कार भारती यवतमाळचे अध्यक्ष तथा शिबिर संयोजक डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. दोन तासपर्यंत चाललेल्या या समारोप समारंभास सर्व शिबिरार्थी, त्यांचे पालक, प्रशिक्षक, मार्गदर्शक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed