माय बाप सरकार निराधारांचे पैसे कधी मिळणार….?
साथी निराधार संघटनेने दिले मुख्यमंत्र्याला निवेदन
घाटंजी, गेल्या पाच महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ, संजयगांधी योजनेचे निराधार पेन्शन थकीत आहे. तसेच तालुक्यातील अपंग, विधवा यांना मिळणारे निराधारचे पैसे हे सुद्धा थकीत आहे. ते तात्काळ मिळण्यात यावे यासाठी साथी निराधार संघटनेचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्याला निवेदन तहसीलदार घाटंजी यांच्या मार्फत देण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांना थकत्या वयात मजुरीला जाऊन पोट भरणे शक्य नाही. कारण शरीरात त्राण नाही. पैसे कमवीत नाही म्हणून घरातही मान नाही. वृद्धापणामुळे अनेक आजार जोडलेले असतात. साध्या ब्लडप्रेशर, शुगरच्या गोळ्या सुद्धा घेण्यासाठी यांच्या जवळ पैसे नसतात. हे म्हातारपन त्यांच्या साठी शापच बनलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांना आधार असतो तो फक्त निराधार पेन्शनचा. मात्र हेच पैसे गेल्या पाच महिन्यापासून थकलेले आहे.
दररोज तहसीलच्या चकरा मारत पैसे आले नाही अशी आपबिती सांगतात. तहसीलमधे ही या वृद्धांना सांगितल्या जाते की आता निराधार मिळण्याची पद्धत बदलणार आहे. तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे त्यामुळे पैसे येण्यास उशीर लागत आहे. मात्र यासाठी पाच महिने निराधार अडवून ठेवणे योग्य नाही.
वृद्ध, दिव्यांग, विधवा यांना मिळणारे निराधारचे पैसे तत्काळ मिळण्यात यावे ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री साहेबांना निवेदना द्वारे केली आहे. हे निवेदन तहसीलदार साळवे साहेब आणि निराधार विभागाचे नायब तहसीलदार सोळंके साहेब यांना देण्यात आले. यावेळी साथी निराधार संघटनेचे संयोजक महेश पवार, निर्मला राठोड, छाया पाटील, विष्णू शिंदे, शोभा राव, लता मडावी, मंदा कोटनाके, विवेक घोडे, आणि शेकडो कार्यकर्ते, निराधार लाभार्थी उपस्थित होते.