दूध विक्रेताच निघाला चोरटा.

हार्डवेअर दुकानातून साडेपाच लाखांच्या रोखेची बॅग लांबविली.

यवतमाळ शहरातील राणा प्रताप गेट परिसरातील एका नामांकित हार्डवेअर दुकानातून ५ लाख ४२ हजार २०० रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासांत चोराचा छडा लावला असून, फिर्यादीच्या घरी दूध पोहोचविणाऱ्या व्यक्तीनेच ही चोरी केल्याचे उघड झाले आहे.

 

साबीर हुसेन भारमल रा. गुलमोहर पार्क, पांढरकवडा रोड यांचे आर्णी रोडवर ‘भारमल हार्डवेअर’ नावाचे दुकान आहे. गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास साबीर हुसेन व्यवहारासाठी घरून ५ लाख ४२ हजार २०० रुपये रोकड असलेली बॅग घेऊन दुकानात आले होते. त्यांनी ही बॅग दुकानाच्या काउंटरवर ठेवली आणि ते कामात व्यस्त झाले. काही वेळाने एका ग्राहकाला पैसे परत करण्यासाठी त्यांनी काउंटरवर पाहिले असता, पैशांची बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेनंतर साबीर हुसेन यांनी तात्काळ अवधुतवाडी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजमध्ये पोलिसांना एक ओळखीचा चेहरा बॅग चोरताना स्पष्टपणे दिसला. तपासअंती ही व्यक्ती साबीर हुसेन यांच्या घरी दररोज दूध पोहोचवणारा दिनेश भाऊराव मंडाले असल्याचे निष्पन्न झाले. विश्वासातील व्यक्तीने आणि दूधवाल्यानेच संधी साधून हातचालाखीने ही चोरी केल्याचे पाहून भारमल यांनाही धक्का बसला. संशयित आरोपी दिनेश मंडाले हा तळेगावचा उपसरपंच असल्याची माहिती समोर आली आहे. अवधुतवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, चोरी केलेली सर्व रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *