नियमित शाळा अजूनही संभ्रमावस्थेतच; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

 

बसेस बंद असतांना NAS २०२१ चाचणी कशी होणार

शिक्षकभारती जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांचा सवाल

यवतमाळ : गत दोन वर्ष कोरोना व लॉक डाऊन मुले सर्वाधिक नुकसान शालेय विद्यार्थ्यांचे झाले आहे. एवढा कालावधी लोटूनही शाळा नियमित सुरु करण्याबाबत शासन व प्रशासनाने धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. वारंवार निघणारे वेगवेगळे आदेश आणि अटींमुळे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारीवर्गामध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. शासनाने तातडीने याबाबत एक सर्वव्यापक धोरण ठरवावे असे आवाहन शिक्षकभारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी केले आहे.

उद्या (ता.१२ नोव्हेंबर) रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण NAS 2021 चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र सध्या राज्यामध्ये एसटी महामंडळाचा संप सुरु असल्याने बसेस बंद आहेत. ग्रामीण भागात वाहतुकीसाठी एसटी हाच विद्यार्थ्यांना परवडण्यासारखा पर्याय आहे. त्यामुळे हि चाचणी कशी होणार असा सवाल पवार यांनी केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा, नियमित शाळा, प्रात्यक्षिक परीक्षा यासह विविध बाबतीत शासन व प्रशासनाने घेतलेले निर्णय शिक्षक व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वादग्रस्तच ठरले आहेत.

आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असूनही शाळांच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय संभ्रम निर्माण करत आहेत. आता जर निश्चित धोरण ठरविण्यात आले नाही तर अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जाऊ शकतात अशी भीती साहेबराव पवार यांनी व्यक्त केली आहे. शासन प्रशासनाने परस्पर निर्णय न घेता मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सर्वसमावेशक निर्णय घ्यावा असे आवाहन पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *