नुकसानग्रस्त शेतक-यांना सरसकट पन्नास हजार हेक्टरी मदत द्या
शेतकरी नेते सिकंदर शहा यांची राज्य सरकारकडे मागणी
प्रतिनिधी यवतमाळ:-विदर्भात परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने घोषीत केलेली मदत अत्यंत तोकडी असून सरसकट शेतक-यांना पन्नास हजार रुपये हेकटरी मदत देण्याची मागणी शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यावर्षी विदर्भात अधिक पाऊस झाल्याने तसेच सोयाबीन काढण्याची तयारी सुरू असतांना सुध्दा पाऊस पडत असल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अति पावसाने कापसाचे पिक सुध्दा काळवंडले असून हा हंगाम सुध्दा शेतक-यांसाठी नुकसान देणारा ठरला आहे. काही शेतक-यांनी सोयाबीन अर्धवट काढले तर काहींनी गंजी मारून ठेवली होती. आलेल्या पैश्यातून यावर्षी दिवाळी साजरी करायची असे स्वप्न पाहना-या शेतक-यांचे परतीच्या पावसामुळे स्वप्ण भंगले आहे. या पावसामुळे सोयाबीनचे उभे पीक अंकुर धरू लागले, अर्धवट काढलेले सोयाबीन जागीच जमिनीवर सडले तर गंजी पाण्याने भीजल्याने त्यामध्ये बूरशी येऊन ते सडल्यागत झाले आहे. कापूस पीकाच्या फुटलेल्या कापसातून सरकीतून कोंब येऊ लागले अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षापासून विदर्भात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काढलेले कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. विदर्भातील शेतकरी वर्षभराची गुजरान शेतीच्या भरोशावरच करतो. आता पिकच न आल्याने वर्षभराचा खर्च कसा करायचा असा प्रश्न सुध्दा शेतक-यांना पडला आहे. राज्य शासनाने नुकतीच अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थीक मदत घोषीत केली आहे. ही मदत अत्यंत तोकडी असून सरसकट पन्नास हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी सिकंदर शहा यांनी केली आहे. याशिवाय नेहमीच दगाबाजी करणा-या विमा कंपणीने शेतक-यांबाबत सहानुभूतीची भावना ठेऊन अडचणीत आलेल्या शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी सुध्दा करण्यात आली आहे.
सरकारने बांधावर यावे
राज्यातील आघाडी सरकारमधील कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस तसेच शिवसेना हे ख-या अर्थाने शेतक-यांचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांना शेतक-यांनी पाठींबा देऊन सत्तेत बसविले आहे. असे असतांनाही अत्यंल्प शेतक-यांना मदत दिली जात असल्याने शेतक-यांमध्ये नाराजीचा सुर आहे. त्यामुळे मायबाप सरकारने प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन शेतक-यांच्या वेदना समजून घ्याव्या तसेच सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी सिकंदर शहा यांनी केली आहे.