मी तुतारीवर लढणार आणि जिंकणारही, माजी आमदार संदिप बाजोरीया.
मी तुतारीवरच लढणार संदिप बाजोरीया लढण्यावर ठाम.
यवतमाळच्या सर्वागिंण विकासासह गुन्हेगारी व भयमुक्त यवतमाळसाठी मी कटीबध्द आहे. पक्षाने दिलेल्या आदेशानंतर मी गत काही महिन्यापासून यवतमाळ मतदार संघ पिंजुन काढला. राष्ट्रवादी पक्षासाठी वातावरण निर्मितीही झाली. मात्र ऐनवेळी षडयंत्र रचून महाविकास आघाडीची उमेदवारी काँग्रेस पक्षाला देण्यात आली. मात्र मी तुतारीवर लढणार आणि जिंकणारही असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी आमदार संदिप बाजोरीया यांनी आपण ही निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा निर्धार आज बोलून दाखविला.
संदिप बाजारीया यांच्या संपर्क कार्यालयात आज बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लढण्याचा निर्धार व्यक्त करतांनाच शहराच्या बकाल अवस्थेवर व वाढत्या गुन्हेगारीला विद्यमान आमदार जबाबदार असल्याचे सांगत आपल्या खास शैलीत आमदार येरावार यांचा खरपुस समाचार घेतला.
महाविकास आघाडीचा घटक असल्याने उमेदवारी जाहीर होण्यापुर्वी अनेकदा आपण काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांच्यासाठी आघाडीने जागा सोडली तर आपण त्यांना तन, मन, धनाने मदत करू, अशी घोषणा केली होती. पण आघाडीकडून आपल्या महाविकास आघाडीचा एक राष्ट्रवादी पक्षाला ही जागा सुटली तर मांगुळकर यांनी आपणास मदत करण्याचे जाहीर आश्वासन द्यावे, अशी अनेकदा अपेक्षा व्यक्त केली. मात्र आघाडीचे सध्याचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनी आपल्या उमेदवारीला सहकार्य देण्याबाबत एक अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे संदिप बाजोरीया व आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची त्यांना मुळीच गरज नाही ही बाब समजुन आली. बाळासाहेब मांगुळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला व त्यात आलेल्या समिश्र प्रतिक्रीयानंतर आम्ही ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, असे बाजोरीया यांनी सांगितले.
या निवडणुकीत आपण विजयी होणार असा दावा करतांनाच त्यांनी भाजपाचे आमदार मदन येरावार यांचा पराभव हेच आपले ध्येय व लक्ष्य असल्याचे सांगितले. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक असून पक्षाच्या विरोधात आपण कुठेही दगा फटका केला नाही व पक्षाच्या विचारधारेशी बेईमानी केली नाही. महाविकास आघाडीचे दारव्ह्याचे उमेदवार माणिकराव ठाकरे तथा राळेगावचे आघाडीचे उमेदवार वसंत पुरके यांचा आपण प्रचार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले. मात्र आघाडीतील ज्या उमेदवारांना आमचे अस्तित्वच मान्य नाही, त्यांच्यासाठी आम्ही प्रचाराला जाणार नसल्याचे बाजोरीया यावेळी म्हणाले.