मुदत संपल्यानंतरही अमृतच्या कंत्राटदारावर कारवाईस टाळाटाळ
मुदत संपल्यानंतरही अमृतच्या कंत्राटदारावर कारवाईस टाळाटाळ शिवसेना शहर प्रमुख पिंटु बांगर यांचा संताप
प्रतिनिधी यवतमाळ :- अमृत योजनेच्या कामाचा कालावधी संपल्यानंतरही नागरीकांना या योजनेचे पाणी मिळालेले नाही. हे काम पुर्ण करण्यासाठी सतत कंत्राटदाराला तारीख पे तारीख दिली जात आहे मात्र न्याय मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी संताप व्यक्त करीत थेट पालकमंत्री यांना साकडे घालणार असल्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
सदर काम करणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका तसेच त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने याआधीच करण्यात आली होती. दरम्यान जनतेला होत असलेल्या त्रासाच्या अनुषंगाने शिवसेनेच्या पदाधिका-यांनी आंदोलन केले असता त्यांच्यावरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. दुसरीकडे कंत्राटदार कामे सुध्दा जलदगतीने पुर्ण करण्यास तयार नाही. त्यामुळे आता नागरीकांच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्याशिवाय पर्याय उरला नसल्याची प्रतिक्रिया पिंटु बांगर यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री तसेच सदस्य सचिव यांनी संबंधित कंत्राटदारास प्रथम एक महिण्याचा अल्टीमेटम दिला होता. त्यांनंतर पुन्हा वेळ वाढवून देण्यात आला. आता तीन महिणे झाले तरी कामे पुर्ण झालेली नाही.
यवतमाळ शहराला बेंबळा धरणातील पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम सुरु आहे. केन्द्र तसेच राज्य शासनाच्या निधीतून होणारे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले आहे. टेस्टींग दरम्यान पाच वेळा पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या योजनेत वापरण्यात येणारे पाईप निकृष्ट दर्जाचे आहे. कामाचा कालावधी संपल्यानंतरही नागरीकांना या योजनेचे पाणी अद्याप मिळालेले नाही. सध्या नागरीकांना दहा दिवस आड यापध्दतीने पाणी पुरवठा केल्या जात आहे. अमृत योजनेचे काम सन 2019 मध्ये पुर्ण करायचे होते. मात्र कंत्राटदाराच्या अडेलतट्टू धोरणामुळे या योजनेचे काम अजुनही पुर्ण झालेले नाही. पालकमंत्री महोदयांनी दोन वेळा वेळ वाढवून देऊनही कामे पुर्ण झालेली नाही. शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक भागात पाण्याच्या टाक्या बनविण्यात आल्या आहे. या टाकीमध्ये पाणी आनून नागरीकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येणार होता. हा पुरवठा सुध्दा सुरु झालेला नाही. एकीकडे कंत्राटदार कुणाचेच एैकायला तयार नाही तर दुसरीकडे नागरीकांचा लोकप्रतिनिधींवर दबाव वाढत आहे. लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. त्यामुळे पालकमंत्री महोदयांची भेट घेऊन या प्रकरणात आता ठोस कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
तिव्र आंदोलन करणार
कंत्राटदार कामे करीत नाही, दुसरीकडे नागरीकांचा रोष सहन करावा लागतो. प्रशासन सुध्दा काहीच कारवाई करीत नाही. आंदोलन केले तर गुन्हे दाखल केले जातात. तब्बल 302 कोटीच्या या योजनेचा बट्टयाबोळ झाला आहे. त्यामुळे पुन्हा गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण स्वस्थ बसनार नाही. आता नागरीकांना सोबत घेऊन यापेक्षाही जास्त तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी दिला आहे.