27 जानेवारीपासून इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग सुरू
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आवश्यक
– जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा कोविड प्रतिबंधक उपायोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीसह 27 जानेवारी 2022 पासून सुरु करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले असून प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत कोविड आजाराची परिस्थिती पाहुन 28 जानेवारी रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच 15 ते 17 वयोगटातील मुलांचे लसिकरण 24 जानेवारी पासून करण्यासाठी संबंधीत शाळा सुरू ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी(प्राथमिक) प्रमोद सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी (माध्यमीक) डॉ. शिवानंद गुंडे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या 20 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा याबाबींना प्राधान्य देण्यात यावे. शाळेतील मुलांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन आदींबाबत अवगत करावे. कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश शाळांना देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या.
विद्यार्थी शाळेत उपस्थित राहण्याकरिता पालकांची संमती आवश्यक राहील. सहमती नसणाऱ्या पालकांच्या पाल्यांकरिता ऑनलाईन वर्ग नियमितपणे सुरू ठेवण्याच्या सूचना आदेशीत करण्यात आल्या आहेत.
शाळा दररोज 3 ते 4 तास घेण्याचे, पालकांना लसिकरणासाठी प्रोत्साहीत करण्याचे, जास्त विद्यार्थी असलेल्या शाळेत सकाळ व दुपार च्या पाळीत वर्ग भरविणे, मैदानी खेळ, स्नेहसंमेलन इ. गर्दीचे कार्यक्रमांवर बंदी, सर्दी, ताप, खोकला असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सक्ती न करण्याचे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे तसेच निर्देशीत सूचनांचे शाळेत पालन करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व क्षेत्रीय पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत नियमित तपासणी करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सध्या कोविडचे रोज 300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे तसेच जिल्ह्यातील रूग्णालयात तापाच्या रूग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्या पार्श्वभूमिवर वरील निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
०००००००