वंचितांमध्ये स्वत:चे प्रश्न सोडविण्याची क्षमता निर्माण होणे हेच खरे पुनर्वसन ‘वंदन’ सन्मान सोहळ्यात स्नेहालयचे गिरीश कुळकर्णी यांचे प्रतिपादन
यवतमाळ – महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे. ‘आनंदवन’ला आदर्श मानून राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रेरक सामाजिक कार्य उभे केले आहे. प्रत्येक सामाजिक संस्था आपल्यापरिने वंचित घटकांच्या पुनर्वसनाचे काम करीत आहे. मात्र आम्ही कितीही उत्त्म काम करीत असलो तरी वंचितांमध्ये जोपर्यंत स्वत:चे प्रश्न सोडविण्याची क्षमता निर्माण होत नाही, तोपर्यंत त्यांचे खरे पुनर्वसन होत नाही, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्यातील ‘स्नेहालय’ संस्थेचे संस्थापक गिरीश कुळकर्णी यांनी केले.
येथील मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आज रविवारी महेश भवनमध्ये आयोजित ‘वंदन’ सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील नगरसंघचालक राजेश लोया होते. मंचावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी, जीवनलाल राठी आदि उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते व राठी परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सातवा वंदन सन्मान बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ‘सहारा’ अनाथालय व ‘बालग्राम’ची स्थापन करून वंचित, अनाथ मुलांसाठी काम करणारे संतोष गर्जे व त्यांच्या सहचारिणी ॲड. प्रीती गर्जे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, ५१ हजार रूपये रोख, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी पुढे बोलताना गिरीश कुळकर्णी म्हणाले, गेल्या ७५ वर्षांत भारताने सुईपासून क्षेपणास्त्र बनविण्यापर्यंत मजल गाठली आहे. तरीही नुकत्याच जाहीर झालेल्या भुकेच्या क्रमावारीत आपण पाकिस्तान, नेपाळ या देशांच्याही खाली घसरलो, ही चिंताजनक बाब आहे. देशातील ही परिस्थिती बदलायची असेल तर तरूणांच्या हाती सुत्रे सोपविण्याची गरज आहे. धोरण निर्मितीत तरूणांचा सहभाग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशात आता प्रत्येक जातीचा एक देश तयार झाला आहे, हे धोकादायक आहे. समाजाची एकसंघ प्रगती करायची असेल तर मनाच्या आतील भेद नष्ट करणे गरजचे आहे, असे ते म्हणाले. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांना समाजाने कर्तव्य भावनेतून पाठबळ द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात राजेश लोया यांनी, सामाजिक संवेदना जपणारी नवीन पीढी तयार करण्याचे उत्तरदायित्व समाजाचे आहे, असे सांगितले. ५१ हजार रूपयांच्या राशीचा हा पुरस्कार असला तरी तो ५१ हजार लोकांना प्ररेणा देणारा आहे. अशा कार्यक्रमांमधून सामाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना संतोष गर्जे यांनी यवतमाळशी जावई या नात्याने भावनिक व सामाजिक नाते आहे. आता येथील वंदन सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळण्यासोबतच जबाबदारीही वाढविली, असे सांगितले. काय करायचे नाही हे ठरविले की, काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर सामाजिक कार्यातून आपोआपच मिळत गेले, असे ते म्हणाले. समाजाने सामाजिक संस्थांकडे वंचित म्हणून बघण्याऐवजी प्रेरणास्रोत म्हणून बघावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी यवतमाळकरांच्या वतीने तसेच माहेश्वरी मंडळातर्फे संतोष व प्रीती गर्जे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान क्षेत्रात कार्यरत यवतमाळ येथील निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचाही सत्कार करण्यात आला. संतोष गर्जे यांच्या कार्यावर उत्कृष्ट माहितीपट तयार करणारे दिग्दर्शक आनंद कसंबे, संहितालेखक निखील परोपटे, छायाचित्रणकार करण पेनोरे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पश्चात बालग्रामसाठी दीड लाख रुपयांची देणगी लोकसहभागातून उभी झाली. ही रक्कम बालग्रामला देण्यात आली. कार्यक्रमस्थळी ओवी फाऊंडेशन या दुर्गम भागात मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने मुलांद्वारे निर्मित अतिशय सुंदर पणत्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या उपक्रमास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला व १० हजारांच्या वर पणत्यांची विक्री झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश सावजी यांनी केले. संचालन प्रा. घनश्याम दरणे यांनी केले तर आभार सुरेश राठी यांनी मानले. प्रा. माणिक मेहरे यांनी गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास यापूर्वीचे वंदन सत्कारमूर्ती डॉ. अनिल पटेल, किशोर मोघे यांच्यासह जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.