यवतमाळ,
ललित कलांना समर्पित अखिल भारतीय संस्था संस्कार भारतीच्या यवतमाळ जिल्हा समितीच्या वतीने मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले. संगीत विधेच्या वतीने बालाजी सोसायटी येथील बालाजी मंदिरात शनिवारी संध्याकाळी झालेली ही सभा संस्कार भारती संगीत विधेतील सदस्यांच्या गायनाने रंगली. प्रांत उपाध्यक्ष प्रशांत बनगीनवार, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष विनोद देशपांडे आणि संस्कार भारती यवतमाळचे मंत्री संजय सांबजवार यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व नटराज पूजनाने सभा प्रारंभ झाली. या सभेत संस्कार भारती यवतमाळचे अध्यक्ष दत्तात्रय देशपांडे यांनी प्रास्ताविकातून आयोजनामागची भूमिका विशद करून संगीत विधेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारती ध्येय गीताने झाली.
त्यानंतर डॉ. अमृता पुनसे, डॉ. जया मनवर, अर्चना संत, स्मिता भट, मोहिनी कुडमेथे, विद्या बेहरे या गायक कलावंतांनी सादरीकरण केले. सुरुवात ‘तुझ्या कृपेने दिन उगवे हा’ या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर एकाहून एक अप्रतिम भक्तीगीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढली आणि कार्यक्रमाची सांगता ‘जगत जननी भवतारणी’ या माँ भवानीच्या भैरवीने झाली.
संवादिनीवर कमलेश मुंदेकर यांनी, तबल्यावर नरेंद्र पाटणे व अजिंक्य शिंदे यांनी तर तालवाद्यावर चंद्रशेखर सवाने यांनी सुरेख साथ केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संस्कार भारती सहमंत्री भक्ती महेश जोशी हिने केले तर आभार प्रदर्शन प्रिया कांडूरवार यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाची सुंदर मांडणी संगीतविधा संयोजक अपर्णा शेलार यांनी केली. कार्यक्रमाला प्रा. डाॅ. सौ. माणिक मेहरे, प्रा. डाॅ. सौ. स्वाती जोशी, संस्कार भारती प्रांत भू-अलंकारण विधा संयोजक राजश्री कुलकर्णी, प्रांत मंत्री प्रा. डाॅ. ताराचंद कंठाळे, प्रांत बाल विभाग संयोजक जयंत चावरे, यवतमाळ अध्यक्ष दत्तात्रय देशपांडे, मंत्री संजय सांबजवार, जीवन कडू, शारदा घोटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संगीत रसिक व विद्यार्थी उपस्थित होते.