पोलीस बांधवाना दिवाळी बोनस द्या —- खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी 

पोलीस बांधवाना दिवाळी बोनस द्या 
 
खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी 
यवतमाळ : मागील दोन वर्षात कोरोना काळात आरोग्य कर्मचारी आणि त्यांच्या साथीने जे या कठीण काळात रस्त्यावर उभा होता, ते म्हणजे पोलीस. मात्र या पोलीस बांधवांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. पोलीस बांधवांची ड्युटी 24 तास असते सुट्टी ही नावालाच असते, कारण पोलिस ऑन ड्युटी 24 तास कामावरच असतो. कोणताही सण,उत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो घरातील भांडण असो वा गल्लीतील भांडण असो पोलिस बांधवाना तेथे उभे राहवेच लागते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात प्रकाशमान दिवाळी करण्याकरिता एक महिन्यांच्या पगार बोनस देण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
     पोलिसांची कोरोना काळातील कामगिरी मोठी असून अनेक पोलीस आपल्या कर्तव्यावर असताना कोरोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडले. त्यासोबतच राज्यातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. प्रसंगी २४ तास कर्तव्य बजवावे लागते. अनेकदा प्रसंगावधान व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन पोलीस बांधव नागरिकांच्या मदतीला धावून जातात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन म्हणून इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा मिळायला हव्यात. अद्याप त्यांना दिवाळी भेट म्हणून बोनस जाहीर केलेला नाही. त्यांना बोनस जाहीर करून दिवाळीची गोड भेट देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *