मुख्यमंत्र्यांनी दिले गरीबांना चॉकलेट गुरुदेव युवा संघाचा आरोप

प्रतिनिधी यवतमाळ:-दिवाळी चार दिवसांवर आली तरी राज्य शासनाकडून प्रति कुटुंब शंभर रुपयांत दिली जाणारी स्पेशल ‘रेशन किट’ जिल्ह्यात आलीच नसल्याने प्राधान्य गट, अंत्योदय व शेतकरी अशा जिल्ह्यातील एकूण ५ लाख ७७ हजार ८१ लाभार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे. एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ व एक किलो पामतेल या चार गोष्टींचा समावेश असलेली ही किट दिवाळीच्या आधी मिळणार, की नंतर? असा प्रश्न गुरुदेव युवा संघाकडून उपस्थित केला आहे. दिवाळीच्या आधी मिळाली तर गोरगरीबांची दिवाळी गोडधोड फराळ तयार करण्यासाठी उपयोग होईल. परंतु, नंतर मिळाली तर मात्र तिचा कोणताही फायदा होणार नाही. उलट हातचे पैसे खर्च करून लाभार्थ्यांना बाजारभावाने साहित्य खरेदी करावी लागणार आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीनिमित्त रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयांत चार उपयोगी वस्तूंचे स्पेशल किट देण्याचा निर्णय घेतला. याची जोरदार जाहिरातही केली जात आहे. मात्र हा निर्णय म्हणजे केवळ गोरगरीबांना चॉकलेट असल्याचे आता दिसून येत आहे.
याच प्रश्नाबाबत गुरुदेव युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवदेन देण्यात आले. यावेळी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, प्रफुल मानकर, समाधान रंगारी, भावराव वासनिक, स्वप्नील कोंकाडे व मंदा मानकर यावेळी उपस्थित होते.
आता दिवाळीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना शासकीय गोदामांमध्ये ही किटच पोहोचली नाही. शासनाला आम्ही लाभाथ्र्यांची माहिती पाठवली. परंतु, शासनाकडून ही किट जिल्ह्याला नेमकी केव्हा उपलब्ध होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही
. बरेचदा शासनाकडून रेशन दुकानांमध्ये उशिरा गहू, तांदूळ येतो. या महिन्याचे रेशन दुसऱ्या महिन्यात घ्यावे लागते. असा प्रकार या किटबाबत होऊ नये, एवढीच अपेक्षा करता येईल. कारण शहरासह जिल्ह्यातील बहुतेक सर्वच रेशन दुकानांमध्ये जाऊन लाभार्थी दिवाळीची स्पेशल किट आली काय? असा एकच प्रश्न विचारत आहेत. त्यांना नकारार्थी उत्तर ऐकून निराशमनाने घरी परतावे लागत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केवळ जाहिरातीसाठी ही घोषणा केली काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. हे सरकार आले तेव्हापासून फक्त घोषणा व मोठ मोठ्याला जाहिराती करण्यातच समाधानही आहे. तरी सरकारने या गोरगरीब जनतेला दिवाळीपुर्वी राशन किट उपलब्ध करुन द्यावी. अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.