जिल्हयातील 24 गावात लवकरच दुरसंचारची फोर जी सेवा–खासदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी यवतमाळ:-नेटवर्क नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या शेतकरी तसेच ग्रामीन भागातील नागरीकांच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने खासदार भावनाताई गवळी यांनी पाठपुरावा करताच आता यवतमाळ जिल्हयातील 24 गावात दुरसंचारची फोर जी सेवा प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे या गावांशिवाय आनखी 12 गावांत फोर जी सेवा प्रस्तावित असून नागरीकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास मोबाईल चे नेटवर्क अत्यंत महत्वाचे आहे. याशिवाय पिकविमाची माहिती भरणे किंवा शेतीशी संबंधीत मार्गदर्शन घेण्यासाठी सुध्दा शेतकरी आता विविध अॅप्स चा वापर करतात. मात्र नेटवर्क मिळत नसल्याने अनेक शेतकरी तसेच गावक-यांना अडचण जात असल्याच्या तक्रारी खासदार भावनाताई गवळी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने खासदार भावनाताई गवळी यांनी पाठपुरावा करुन यवतमाळ जिल्यातील 24 गावांसाठी फोर जी सेवा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये दारव्हा तालुक्यातील गणेशपुर तांडा, भिलेश्वर, पाभळ, दिग्रस तालुक्यातील मोखा, आर्णी तालुक्यातील शिऊर, घाटंजी तालुक्यातील कलेश्वर, साईफळ, आंबेझरी, कळंब तालुक्यातील खोराड, केळापुर तालुक्यातील मांगुर्डा, महागाव तालुक्यातील शिरमळ, मारेगाव तालुक्यातील अर्जुनी, पुसद तालुक्यातील जनुना, रामपुर, येलदरी, उमरखेड येथील डोंगरगाव, गडी, जवराळा, वणी तालुक्यातील धुनकी, येनक, झरी जामणी भागातील बैलमपुर
तसेच यवतमाळ तालुक्यातील उमरविहीर, रोहाना तसेच जांभुळणी गावांचा समावेश आहे. याशिवाय सांडवा पुसद, किटा बाभूळगाव, झापरवाडी आर्णी, सेंदुरसनी आर्णी, बोपापुर झरी, वरुड यवतमाळ, मानपूर यवतमाळ, कान्होली कळंब, बोथा उमरखेड, पळशी उमरखेड, सावरखेडा राळेगाव, लोणी राळेगाव येथील फोर जी सेवेची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. या कामांचा आढावा खासदार भावनाताई गवळी यांनी घेतला. याप्रसंगी दुरसंचार विभागाचे सहायक महाप्रबंधक रविन्द्र मलये, विभागीय अभियंता गजानन सुर्यवंशी उपस्थित होते.
नेटवर्क नसल्यास संपर्क साधा
अनेक शेतकरी तसेच गावक-यांच्या नेटवर्क नसल्याबाबत तक्रारी मला प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आम्ही पाठपुरावा केल्यामुळे आता 24 गावात लवकरच फोर जी ची सेवा सुरु होणार आहे. याशिवाय बारा गावे प्रस्तावित करण्यात आली आहे. ज्या गावात इतर खासगी नेटवर्क ची फोर जी सेवा नसेल किंवा अत्यल्प नेटवर्क असेल अशा गावांतील नागरीकांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधल्यास त्या गावात फोर जी सेवा उपलब्ध करुन देण्याचा आम्ही प्रयत्न करु.
भावनाताई गवळी
खासदार, यवतमाळ- वाशिम