मनोज जरांगे यांच्या आवाहनाला यवतमाळातून प्रतिसाद
मनोज जरांगे यांच्या आवाहनाला यवतमाळातून प्रतिसाद
प्रहारचे उमेदवार बिपीन चौधरी यांनी दिले शपथपत्र.
यवतमाळ प्रतिनिधी :- मराठा आरक्षणाबाबत जो व्यक्ती विधानसभेत आवाज उचलण्याची ग्वाही देईल त्याच उमेदवाराला आपण पाठींबा जाहिर करणार असे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी जाहिर केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज राज्यात प्रथम यवतमाळ येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच यवतमाळचे संभाव्य उमेदवार बिपीन चौधरी यांनी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र जाहिर केले आहे.
या शपथपत्रात त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देण्याचा तसेच त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे जाहिर केले आहे. या प्रतिज्ञा पत्रानंतर मनोज जरांगे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनोज जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाजाने महायुतीच्या उमेदवारांविरुध्द मतदान केले. यामुळे महायुतीच्या अनेक उमेदवारांना त्याचा फटका बसला. आता विधानसभा निवडणूकीत सुध्दा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उचलण्याची ग्वाही देणा-यास आपण पाठींबा जाहिर करणार असल्याचे घोषीत केले. त्यामुळे यवतमाळचे बिपीन चौधरी यांनी आज पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर लिहुन मराठा समाजाचा आवाज बुलंद करणार असल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे यापुर्वी मराठा आरक्षणाकरीता अनेक आंदोलन करण्यात आले त्यात सुध्दा आपला सक्रीय सहभाग असल्याचा उल्लेख बिपीन चौधरी यांनी शपथपत्रात केला आहे.