सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात चांगले काम करता आले – डॉ.पंकज आशिया

 

 डॉ.पंकज आशिया यांना निरोप.

 जिल्हाधिकारी विकास मीना यांचे स्वागत.

यवतमाळ,  : महसूलसह सर्व विभागांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे यंत्रणेवर देखील कामाचा ताण आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या सहकार्यामुळे येथे चांगले काम करता आले. माझ्या आतापर्यंतच्या सर्व कारकीर्दीत यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त काम केल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन मावळते जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.

बचत भवन येथे मावळते जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना निरोप व नवनियुक्त जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.आशिया बोलत होते. यावेळी नवीन जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, श्रीमती आशिया, राळेगावचे उपविभागीय अधिकारी विशाल खत्री, केळापुरचे उपविभागीय अधिकारी अमित रंजन, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर आदी उपस्थित होते.

यवतमाळ जिल्ह्यात पुर्वी एक वर्ष मी काम केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून एक वर्ष आठ महिने काम करण्याची संधी मिळाली. एकाच जिल्ह्यात सर्वाधिक कामाचा हा कालावधी आहे. या काळात जिल्ह्याशी वैयक्तिक आपुलकी निर्माण झाली. जिल्ह्यात काम करत असतांना शंभर टक्के देण्याचा प्रयत्न मी केला. सेवा हमी कायद्यांतर्गत चांगले काम करता आहे. येथील कार्यकाळ माझ्यासाठी महत्वाचा होता, असे पुढे बोलतांना डॉ.आशिया म्हणाले. सोबत काम केलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी विकास मीना म्हणाले, जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना डॉ.पंकज आशिया यांनी चांगले काम करुन ठेवले आहे. तेच काम आपल्याला पुढे न्यायचे आहे. डॉ.आशिया यांनी सेवा हमी कायदा, अभिप्राय कक्षासारखे चांगले उपक्रम राबविले. त्यांच्या कामाचा वारसा सर्वांनी मिळून पुढे नेऊ सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न करू, असे श्री.मीना म्हणाले.

पोलिस अधीक्षक कुमार चिंता व सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांनी देखील डॉ.आशिया यांच्या कार्यकाळावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी केले. श्री.उंबरकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, गोपाळ देशपांडे, महसूल कर्मचारी संघटनेचे रविंद्र राऊत यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध अधिकारी, कर्मचारी संघटना, कार्यालये, अधिकारी, कर्मचारी यांनी मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला व नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचलन कळंबचे तहसिलदार धिरज थूल यांनी केले तर आभार यवतमाळ तहसिलदार योगेश देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed