गर्भवती महिलेसह सावंगी गावातील ९ लोकांची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका
वणी तालुक्यात शोध बचाव पथकाची तातडीची मदत
तालुका प्रतिनिधी :- यवतमाळ जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे वणी तालुक्यात नदी, नाल्यांना पूर आला आहे. निरगुडा नदीच्या काठी वसलेल्या नविन आणि जुन्या सावंगी गावाचा बॅक वॉटरमुळे संपर्क तुटला आहे. आज नवीन सावंगी येथून आजारी असलेल्या
९ लोकांना शोध व बचाव पथकाने पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. यामध्ये एका गर्भवती ( 9 महिने 8 दिवस ) महिलेचा समावेश आहे
वणी तालुक्यातील जुगाद,साखरा, सावंगी, घोन्ता कवडसी, दहेगाव, चिंचोली या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. निरगुडा नदी वर्धा नदीला मिळते. मात्र वर्धा नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात बॅकवॉटरचा वेढा गावांना बसत आहे. सावंगी या गावाला सुद्धा एक ते दीड किलोमीटर बॅकवॉटरचा वेढा बसलेला आहे. नवीन सावंगी आणि जुन्या सावंगी यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक बटर असल्यामुळे दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. नवीन सावंगी मध्ये सुमारे हजार लोकवस्ती असून शोध व बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. आज येथील ९ लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. यामध्ये एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिले सोबत ३ मुलांचा तसेच मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. बाहेर काढलेल्या व्यक्तींमध्ये रामचंद्र गोपाळा वाघमारे, शांता रामचंद्र वाघमारे , बंडू रामचंद्र वाघमारे, विजू खिरटकर, वेदांत विजू खिरटकर, मनीष विजू खिरटकर, प्रदीप आसुटकर, निराक्रश प्रदीप आसुटकर, तसेच गर्भवती महिलेचा समावेश आहे.
या कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शोध व बचाव पथकातिल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
गर्भवती महिलेची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून तिला माहेरी पाठविण्यात आले आहे, तसेच इतर व्यक्तिना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 15 लोकांच्या शोध व बचाव पथकाची चमु यावेळी उपस्थित होती. उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निखिल धुळधर, महसूल, पोलीस व नगर परिषद विभागाची चमु, पोलीस कॉन्स्टेबल पुकार वाकोडे, अमर भवरे, सागर केराम, सुभान अली, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या व्यक्तींचा यामध्ये समावेश होता.
तहसिलदार आणि चमु परिस्थितिवर लक्ष ठेवून आहे.