भूमी अभिलेख कार्यालयाची चौकशी संशयास्पद गुरुदेव युवा संघाचा आरोप
यवतमाळ :- आपल्या कामचुकार धोरणामुळे कुप्रसिद्ध झालेल्या भूमी अभिलेख कार्यालयाची थेट विभागीय कार्यालयाकडून नुकतीच चौकशी करण्यात आली होती.परंतु, चौकशी पथकातील अधिकाऱ्यांनी या कार्यालयाच्या अनागोंदीला पाठीशी घातले असून ही चौकशी प्रक्रिया संशयास्पद असल्याचा खळबळजनक आरोप गुरुदेव युवा संघाने केला आहे.
जमिनीविषयक विविध कामे भूमी अभिलेख कार्यालयातून केली जातात. परंतु, या कामांना घेऊन गेलेल्या सर्वसामान्यांची मनस्ताप सोसल्याशिवाय कामे पूर्ण होत नाही. नोट पुढे केल्यानंतरच अर्जदाराचे काम पुढे ढकलले जात असून अधीक्षकांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही.त्यामुळे बरीच कामे वर्षानुवर्षे पूर्णत्वास गेली नसल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांच्याकडून करण्यात आला आहे. उपअधीक्षक हे गेल्या साडे सहा वर्षापासून याच कार्यालयात सेवा देत असून त्यांची आजपर्यंत बदली का झाली नाही,त्यांना कुणाचे अभय आहे,असा प्रश्न गेडाम यांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सुटले असून सर्वसामान्यांची कामे वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळेच कार्यालयाचा कारभार पाहून नुकतीच अमरावती विभागीय कार्यालयाने चौकशी समिती नेमून कार्यालयाची पाहणी केल्याची केवळ औपचारिकता पूर्ण केली. वास्तविक त्या कार्यालयातील सावळा गोंधळ बघितलाच नाही. कार्यालयातील रजिस्टरसुद्धा पाहिले नसल्याचा घणाघाती आरोप गेडाम यांनी केला आहे.सदर चौकशी ही गुंडाळण्यात आली असून दोषींवर कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही,त्यामुळे ही चौकशी पुन्हा वेगळ्या अधिकाऱ्यांकडून केली जावी अशी मागणी गुरुदेव युवा संघाने केली आहे. त्यामुळे आता यावर वरिष्ठांकडून काय केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उपअधीक्षक साडे सहा वर्षापासून येथेच
उपअधीक्षक हे गेल्या साडे सहा वर्षापासून याच कार्यालयात सेवा देत असून त्यांची आजपर्यंत बदली का झाली नाही,त्यांना शासकीय नियम लागू होत नाही का? असा प्रश्न गेडाम यांनी उपस्थित केला आहे. त्यांचे कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सुटले असून येथील कर्मचारी
सर्वसामान्यांना वेठीस धरतात आणि त्यांची कामेसुध्दा वेळेत पूर्ण करीत नाही.
तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी अर्जदाराने केली तर त्यास पैशाची मागणी करतात, हे सत्य लपून राहिले नसल्याचे गेडाम यांनी सांगितले.
अर्जदारांना उद्धट वागणूक
या कार्यालयातील बरीच अनागोंदी चालत असून येथील काही कर्मचारी अर्जदारांना उद्धट वागणूक देतात.उपकार केल्यागत त्यांची भाषा असते,तेव्हा अशा कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी महसूल मंत्र्यांनी ठोस पावले उचलावीत,अशी मागणी गेडाम यांनी महसूलमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती,मात्र यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही.
ते स्पेशल ११ कोण?
विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्यांनी बाहेरून स्पेशल ११ माणसे रोजंदारी तत्वावर कामावर ठेवली आहेत. एकप्रकारे ही नियुक्ती गैर असून त्यांना पगार कसा दिला जातो,याचा खुलासा संबंधित कार्यालयाने करावा,अशी
मागणी गुरूदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केली आहे. त्यांना नेमणारे कोण आणि त्यांना पगार दिला तरी कसा जातो याची माहिती जनतेपुढे आणली जावी,अशी मागणी गेडाम यांची आहे.