October 30, 2024

” मंत्रीपद न मिळाल्याने बच्चु कडू शेतीच्या धु-यावर ” शेतकरी नेते सिकंदर शहा यांची टिका

प्रतिनिधी यवतमाळ :- अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या भरीव मदतीची गरज असताना सरकारने तोकडी मदत जाहीर केली. यादरम्यान आमदार बच्चु कडू यांना शेतकरी आठवले नाही. आता मात्र मंत्रीपद मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने आमदार बच्चु कडू शेतीच्या धु-यावर पोहोचल्याची टिका शेतकरी वारकरी संघटनेचे नेते सिकंदर शहा यांनी केली आहे.

 

आज यवतमाळ जिल्हयातील बाभूळगाव तालुक्यातील काही गावात बच्चु कडू यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. बच्चु कडू हे सत्तेसाठी महाविकास आघाडी सोडून भाजपाच्या गोटात जाऊन बसले. सत्तेसाठी गोहाटीची वारी केली. ज्या शेतक-यांनी बच्चु कडू यांना विधानसभेत पाठविले त्यांना धीर द्यायचा सोडून बच्चू कडू सत्तेची स्पप्ने पाहण्यात दंग झाले होते. आता मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार रखडताच बच्चू कडू कासाविस झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेतक-यांच्या भेटी घेण्यामागे सुध्दा सत्तेचे राजकारण लपले असून निव्वळ मंत्रीपद मिळावे यासाठी भाजप आणि शिंदे गटावर दबाव निर्माण करण्यासाठी बच्चु कडू शेतीच्या धु-यावर आल्याची टिका सिकंदर शहा यांनी केली आहे. यवतमाळ जिल्हयात अतिवृष्टीने खरीप हंगाम पाण्यात गेला. अखेरच्या टप्प्यात पिके काढतांना सुध्दा पाऊस आल्याने पिकाचे नुकसान झाले. आज शेतकरी हवालदिल झाला असतांना सत्तेत बसलेले राजकारण करीत आहे. शेतक-यांचे प्रश्न गंभीरतेने सोडविले जात नसल्यामुळे आत्महत्तेत सुध्दा वाढ झाली आहे. या सर्व परीस्थितीला केन्द्रातील मोदी तसेच राज्यातील शिंदे सरकार जबाबदार असल्याची टिका सिकंदर शहा यांनी केली आहे.

अधिकारी तुपाशी शेतकरी उपाशी

भाजपा तसेच शिंदे सरकार आपले सरकार वाचविण्यात मग्न आहे. यामुळे त्यांचे प्रशासनावरचे नियंत्रण सुटले असून अधिकारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी अवस्था निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्हयात पटवारी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यातील भांडणामुळे नुकसानग्रस्त शेतीचे नीट सर्वेक्षण झाले नाही. ऑफिस मध्ये बसून सर्वेक्षण केल्याने शेतक-यांना तोकडी मदत मिळाली आहे. दुसरीकडे शेतीमालाला भाव नाही. सोयाबिन, कापसाचे भाव पडले आहे. सत्तेची लालसा न ठेवता विधासभेत शेतक-यांचे सर्व प्रश्न उचलावे अन्यथा आपली नौटंकी बंद करावी, अशी टिका सुध्दा सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed