यवतमाळ वरून नागपूरकडे निघालेल्या तरुणांच्या कारला अपघात
एकाचा मृत्यू तर चार जण जखमी
भरधाव कारच्या मधात गाय आल्याने कार डिव्हायडरवर आदळली
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यवतमाळ येथून नागपूरकडे निघालेल्या तरुणांच्या कारचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यात यवतमाळ येथील भावेश सुशील भरुट (जैन) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार तरुण गंभीर जखमी झाले. ही वार्ता यवतमाळात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली.
शनिवारी दुपारी यवतमाळ येथील पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात भावेश यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यवतमाळ येथील एका कुटुंबातील साक्षगंधाचा कार्यक्रम नागपूरच्या एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी भावेश भरुट (२२) व अन्य चौघे मारोती सियाज कारने (क्रमांक एम.एच.२७/ बीझेड ८९०६) शुक्रवारी रात्री नागपूरकडे निघाले दरम्यान वर्धा जिल्ह्यातील सेलूजवळ गायीला वाचविताना त्यांची कार डिव्हायडरवर आदळली.
कारचा वेग प्रचंड असल्याने ही कार डिव्हायडर ओलांडून पलट्या घेत आदळली. त्यात कार चालवित असलेले भावेश भरुट रा. पेशवे प्लॉट, यवतमाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर यश गणेश इंगोले, शंतनू रामभाऊ पराते, ऋतिक गजानन गायकवाड व अथर्व चिंतावार सर्व रा. यवतमाळ हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यावेळी मागून आलेली ट्रॅव्हल्स ला अपघात दिसताच त्यातील नागरिकांनी सेलू पोलिसांना माहिती दिली व जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यात आले. या घटनेने संपूर्ण यवतमाळ शहरात शोककळा पसरली आहे