भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या उद्दामपणाचा पत्रकारांकडून निषेध.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या उद्दामपणाचा पत्रकारांकडून निषेध.
जिल्हाध्यक्ष व आमदारांच्या भूमिकेवरही नाराजी,
पोलीस अधिक्षकांची घेतली भेट.
यवतमाळ :- भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यवतमाळ विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत उद्दामपणाचे वर्तन करीत पत्रकारांना दमदाटी करून त्यांना सुपारिबाज संबोधल्याच्या कृतीचा पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित भाजप जिल्हा अध्यक्ष व आमदारांच्या भूमिकेवर देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
यवतमाळ भाजपाने शुक्रवारी दि 11 नोव्हेंबर रोजी चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद आयोजित करून पत्रकारांना निमंत्रित केले होते. पत्रकार परिषदेत पत्रकार बंधूंनी स्वाभाविकच जिल्ह्यातील मंत्री संजय राठोड यांचेवर वाघ यांनी पूर्वी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारले मात्र त्याला नीट उत्तर देण्याऐवजी त्यांचा तोल सुटला, त्यांची प्रस्तावना झाल्यानंतर पत्रकारांनी अडचणीचे प्रश्न विचारूच नये अशा पद्धतीने त्यांचे वर्तन सुरू झाले. सुरवातीपासूनच पत्रकारांना दमदाटी केल्यासारख्या त्या बोलू लागल्या, एव्हढेच नव्हे तर पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, पत्रकार सुपारीबाज आहे अशा बावचळल्या शब्दात त्यांनी पत्रकारांवरच गरळ ओकली. चित्रा वाघ ह्यांची ही मगृरीची भाषा पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक भाजप ने पत्रकारांना निमंत्रित करून पत्रकारांचाच अपमान केला आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. याच अनुषंगाने आज 12 नोव्हेंबर रोजी यवतमाळ पत्रकार बांधवाकडून विश्राम गृह येथे निषेध सभा आयोजित करून चित्रा वाघ ह्यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदविला.
चित्रा वाघ बेताल बरळत असताना स्थानिक भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनीही पत्रकारांची मुस्कटदाबी करणारे वक्तव्य केले व माजी मंत्री आमदार प्रा अशोक उईके, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. निलय नाईक यांसह उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांनीही मौन बाळगून वाघ यांच्या उर्मट वागणुकीला साथ दिली या कृतीचा देखील पत्रकारांनी निषेध नोंदविला. विश्रामगृह येथे ही निषेध सभा झाली. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत राऊत, सचिव सुरेंद्र राऊत, राज्य प्रतिनिधी नागेश गोरख, सुकाणू समिती अध्यक्ष रघुवीरसिंह चौहान, केशव सवळकर, अंकूश वाकडे, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर मेहरे, नितीन पखाले, जेष्ठ पत्रकार टी ओ अब्राहम, किशोर जूननकर, विजय बुंदेला, शेख शाकीर, कपिल श्यामकुंवर, राहुल पाटील सुकांत वंजारी आदींनी निषेध सभेला संबोधित करून पत्रकारांचा होणारा अपमान खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट केले. चित्रा वाघ ह्यांनी अमरावतीत देखील पत्रकारांशी उद्धटपणा केला व यवतमाळ मध्येही पत्रकारांना दरडावणारी भाषा वापरल्याने भाजप नेतृत्वाने त्यांच्या वर्तणुकीबाबत दखल घेऊन कारवाई करण्याची व स्थानिक जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनाही समज देण्याची मागणी केली. या निषेध सभेला ग्रामीण पत्रकार संघ, पत्रकार संरक्षण समितीचे पदाधिकारी यांचेसह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत पोलीस शिरल्याने एसपींची भेट
चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून गोंधळ निर्माण केल्यानंतर लागलीच त्याठिकाणी पोलिसांचा ताफा शिरला, जेष्ठ पत्रकार टी ओ अब्राहम यांचा हात धरून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. याबाबत पत्रकारांनी पोलीस अधिक्षक पवन बनसोड यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधिताला समज देणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.