पुजा चव्हाण प्रकरणावरुन चित्रा वाघ आणि पत्रकारामध्ये जुंपली

लढा सुरुच ठेवणार असल्याचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी यवतमाळ :- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप करून आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही काय, असा प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भडकल्या. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पत्रपरिषदेत का बोलावले. यापुढे अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करायचे नाही, असा दम स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी चित्रा वाघ आणि पत्रकारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या प्रकरणाची खमंग चर्चा आता यवतमाळात सुध्दा सुरु झाली आहे.

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारतात चित्रा वाघ यांनी विदर्भ दौरा सुरु केला आहे. आज त्यांनी यवतमाळ येथे भेट दिली. यावेळी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारने गेल्या १०० दिवसांत महिलांच्या सन्मानासाठी राबविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. याच अनुषंगाने पत्रकारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात केलेले आरोप मागे घेऊन आपणही त्यांना क्लीनचिट दिली का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा आपली संजय राठोड यांच्याविरोधात सुरू असलेली लढाई त्यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राठोड यांना मंत्रीमंडळात घेतले. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर आरोप करून त्यांचे राजकीय जीवन उद्धवस्त केले नाही काय, असा प्रश्न एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने विचारताच वाघ यांनी, तुम्ही संजय राठोड यांचे पीआरओ असल्यासारखे बोलू नका. अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परीषदेत पुन्हा बोलवू नका असेही सांगीतले.

वाद वाढल्याने बहुतांश पत्रकारांना वाघ यांनी प्रश्न विचारू दिले नाही.

त्यामुळे पत्रकार आणि वाघ यांच्यात वादाची ठिणगी उडाली. संजय राठोड यांच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर गेल्या दोन वर्षात आपण व परिवाराने खूप त्रास सहन केला, असे वाघ म्हणाल्या. मात्र न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वादानंतर सर्व पत्रकार निषेध नोंदवून पत्रपरिषदेतून बाहेर पडले. एकंदरीत या वादामुळे पुजा चव्हाण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. पत्रकार परीषदेला आमदार अशोक उईके, निलय नाईक, संजीवरेड्डी बोतकुरवार, नितीन भुतडा, आरती फुफाटे, रेखा कोठेकर, सुरज गुप्ता, राजु पडगीलवार, शंतनु शेटे उपस्थित होते.

महिलांबाबत धोरण सर्वसमावेशक असावे

मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर कोणाचेही नाव न घेता चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला चिमटा काढला. एका पक्षाची नेता किंवा नेत्याच्या मुलीबद्दल कोणी काही बोलले तर त्यातून समस्त महाराष्ट्राचा अपमान झाला, असे बिंबविण्याची सुरू झालेली पद्धत बंद झाली पाहिजे. राज्यात स्त्री-पुरुष समानता आहे. महिलांनाही समान अधिकार आहेत. त्यामुळे सर्व महिलांचा सन्मान प्रत्येकाने ठेवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिला सुरक्षित नव्हत्या. त्यांचेवर याबाबत टिका केली असता उध्दव ठाकरे हे गुजरात, मध्यप्रदेश मधील स्त्री अत्याचाराचे आकडे सांगायचे. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने महिला सन्मान आणि सुरक्षाविषयक धोरणे आखल्याने महिलांना अधिक सुरक्षितता लाभत असल्याचे वाघ यांनी सांगितले. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार महिलांवरील अत्याचाराबाबत संवेदनशील आहे. महिलांकडे वाकड्या नजरेने बघणा-यांची गय केली जाणार नाही असेही त्या म्हणाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed