बिरसा मुंडा यांच्या कार्यातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी- साहेबराव पवार
देवानंद पवार मित्र परीवाराचा बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम उत्साहात
प्रतिनिधी यवतमाळ :- बिरसा मुंडा हे फक्त् आदिवासी समाजाचे नसून देशाचे वीर सुपूत्र होते. अवघे 19 वर्षाचे असतांना त्यांनी इंग्रजांविरुध्द लढा पुकारला. उल गुलान नावाचे आंदोलन सुरु केले. त्यांच्या या कार्यातून समाजहितासाठी युवकांनी प्रेरणा घ्यायला हवी, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पवार यांनी केले. ते घाटंजी तालुक्यातील दत्तापूर येथे आयोजीत बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात बोलत होते. देवानंद पवार मित्र परीवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुध्द लढा पुकारल्याने त्यांना कारागृहात डांबण्यात आले. तेथे त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्याची लढाई जिद्दीने लढली. हातात तिरकमान घेतलेल्या बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली. जेल मध्ये खूप छळ करण्यात आल्याने अवघ्या पंचविस वर्षाचे असतांना त्यांचा मृत्यू झाला. हा इतिहास तरुणांनी माहिती करुण घेतला पाहीजे. निव्वळ मोबाईल मध्ये तल्लीन राहणा-या युवकांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी झटले पाहीजे असेही साहेबराव यांनी सांगीतले. या कार्यक्रमाला आदिवासी नेते जयवंत आडे, रमेश तोडसाम, ग्राम पंचायत सदस्य जयवंत राठोड, अरुण राठोड, रिता उईके तसेच सौ. चेतना देवानंद पवार, सौ. अरुणा साहेबराव पवार उपस्थित होते.
बालकांना कपड्यांचे वाटप
मान्यवरांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जवळपास दोनशे लहान बालकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीन भागातील गरीब तसेच होतकरु परीवारातील बालकांना साधे नविन कपडे सुध्दा घालायला मिळत नाही. त्यामुळे देवानंद पवार मित्र परीवाराच्या वतीने कपडे वाटपाचा कार्यक्रम सुध्दा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे गावातील नागरीकांनी कौतुक केले.