एसटी कर्मचाऱ्यांची होणार दिवाळी गोड
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजारांचा बोनस
यवतमाळ/अवघ्या विस दिवसावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीचे नियोजन सर्वसामान्यांकडून सुरू झाले आहे. दिवाळीनिमित्त मिळणाऱ्या बोनस आणि दिवाळी भेटीकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
जिल्ह्यातील चार हजारावर कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. तर सणानिमित्त अग्रिम रक्कम म्हणून १२,५०० रुपये देण्यात येतील. ही रक्कम बिनव्याजी असेल. त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
राज्यात महा विकास आघाडी सरकार सत्तेवर असताना सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये
सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. यंदाही एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. एसटी महामंडळाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. तो मंजुर झाला असून यंदाही पाच हजार रुपये मिळणार आहे.
ज्या तृतीय व चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांचे वेतन ४३ हजार ४७७ रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम म्हणून अकरा हजार ५०० रुपये देण्यात येणार आहे. महामंडळ तोट्यात असल्याने राज्य सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर महामंडळ कर्मचाऱ्यांचे वेतन होत आहे.