कंत्राटी कर्मचाऱ्यांचे १५ वर्षांपासून हाल

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन शल्यचिकित्सक कार्यालयासमोर उपोषण
यवतमाळ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गत १५ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. या मानधनात वाढ करण्यासोबतच त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शल्यचिकित्सक कार्यालयासमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी कृती समितीने उपोषण सुरू केले.
गत १५ वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर खेडोपाडी आणि शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका, सहाय्यिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी
संवर्गात कंत्राटी कर्मचारी काम करीत आहे.
कोरोना काळात या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. त्यांना वेतनवाढ देण्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. पाच महिन्यांपासून
समायोजनाची कार्यवाही झाली नाही आणि प्रलंबित प्रश्नही सुटले नाही. यामुळे संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात संतोष राठोड, मंगेश वडेकर, पंकज गुल्हाने, सचिन अजमिरे, सुधीर उजवणे, विनेश पाटील, धम्मदीप गायकवाड, माणिक राठोड, अतुल तुपटकर, राज गजभिये, स्वप्नील पवार, राहुल चौधरी, सचिन घोबाडे, स्वानंद बोकारे, डॉ. नीलेश लिचडे, रागिनी ठाकरे, वर्षा चौधरी, प्राजक्ता बनसोड, मोहोरकर, रंजिता बावणे, मनीषा राऊत यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.