October 30, 2024

मारेगाव नगरसेवक जबर मारहाण प्रकरण…आमदार सह भाजप पदाधिकाऱ्यांचे मारेगाव पोलिसात पाच तास ठिय्या आंदोलन

तिसऱ्या डोळ्यावर ठाणेदाराच्या उचलबांगडीची भिस्त

आमदार सह भाजप पदाधिकाऱ्यांचे मारेगाव पोलिसात पाच तास ठिय्या आंदोलन

 


चौकशी होईस्तोवर चार दिवस राहणार ठाणेदाराची खुर्ची रिकामी

मारेगाव : दुर्गादेवी विसर्जन साठी वीस मिनिटं अधिकचे मागल्यानंतर मारेगाव येथील भाजप चे नगरसेवक राहुल राठोड यांना पोलिसात बोलाविले आणि कॅबिनमध्ये ठाणेदारांनी मारहाण केली.तशा आशयाचे व्रण पिडीत नगरसेवक यांच्या पाठीवर असल्याने ठाणेदार जनार्दन खंडेवार यांची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी करण्यात आली.हे प्रकरण आता तापण्याचे व शेकण्याचे संकेत आहे.पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ताठर भूमिकेने प्रकरण कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता तिसरा डोळाच उचलबांगडी साठी दगडाचा मैल ठरणार आहे.

मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 16 मधील सार्वजनिक दुर्गादेवी विसर्जन शुक्रवारी करण्यात आले.यात अनेक युवक थिरकत असतांना पोलीस प्रशासनाचा आदेशानुसार विहीत वेळ संपल्याचे आदेश तोंडी स्वरूपात देण्यात आले.मात्र मंडळांनी विनंतीवजा करीत वीस मिनिटांचा अधिकचा वेळ मागितला.

विहीत वेळ संपताच ध्वनिक्षेपक बंद करण्यात आले. ठाणेदार यांनी नगरसेवक राठोड यांना ठाण्यात बोलावून घेत कॅबिन मध्ये अकारण शिवीगाळ करीत जबर मारहाण केल्याचा राठोड यांचा आरोप आहे.यात राठोड यांच्या पाठीला मारण्याचे व्रण असल्याने ठाणेदाराप्रती सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान , आज शनिवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेसह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येत रोष व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांचेकडे ठाणेदार उचलबांगडी ची मागणी लावून धरली. ही मागणी पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड यांचेशी भ्रमणध्वनी वर सांगितली.मात्र त्यांनी पारदर्शक चौकशी करून सकारात्मक निर्णय घेण्याचे अभिवचन दिले.परिणामी यावर समाधानकारक निर्णय न झाल्याने आमदार बोदकुरवार यांनी एसपी सोबत चर्चा करून उचलबांगडी ची मागणी रेटून धरली अन्यथा ठाणेदार विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा गर्भित ईशारा देण्यात आला.या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून उचलबांगडीची दिशा ठरणार आहे.ठाणेदार हे यवतमाळ मिटिंग ला गेल्याने त्यांचा मुक्काम चार दिवस जिल्हास्थळी राहणार आहे.त्यांच्या अनुपस्थितीत या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

आमदार बोदकुरवार यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्यात तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.सदर प्रकरण प्रधान सचिव पर्यंत पोहचले असून हे मारहाण प्रकरण कोणते वळण घेते याकडे जनतेच्या नजरा खिळल्या आहे.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे , लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर , जिल्हा संघटक नितीन भुतडा , मारेगाव भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे , जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे , पदाधिकारी अविनाश लांबट , प्रशांत नांदे , नगरसेवक राहुल राठोड , वैभव पवार , शशिकांत आंबटकर , सुधाकर बोबडे , युवा शहराध्यक्ष अनुप महाकुलकार , विनित जयस्वाल , मारोती पाचभाई , पांडुरंग उंबरकर , बोटोणी सरपंच सुनीता जुमनाके , राजेश पांडे , गणेश झाडे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी – कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed