सरकार आपल्या दारी म्हणजे “जखम गुडघ्याला आणि मलमपट्टी शेंडीला”
शेतकरी नेते सिकंदर शहा यांची टिका
प्रतिनिधी यवतमाळ :- महाराष्ट्र सरकारने यवतमाळ येथे सरकार आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी केले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री तसेच विविध मंत्री उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सरकार जवळपास 5 कोटी रुपये खर्च करणार आहे. हा प्रकार जखम गुडघ्याला आणि मलमपट्टी शेंडीला असा असल्याची टिका शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे.
सरकार आपल्या दारी कार्यक्रमात यापुर्वीचा अनुभव बघता जन्म मृत्यू दाखले, सात बारा, जाती प्रमाणपत्र वाटण्यापलीकडे या कार्यक्रमातून काहीच साध्य होत नाही. वास्तविक या प्रमाणपत्रांसाठी सेतु सुविधा आधीपासूनच राज्यात सुरु आहे. या सुविधेचा सर्वच नागरीक लाभ घेत असतांना सरकारने निव्वळ प्रसिध्दीसाठी सरकार आपल्या दारी कार्यक्रमांचा सपाटा सुरु केल्याचा आरोप सिकंदर शहा यांनी केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात टारगेट देऊन नागरीकांना बोलविण्यात येत आहे. त्याकरीता 38 लाखाचे भोजन पाकीट वाटण्यात येणार आहे. मोठा मंडप, पार्कींग ची व्यवस्था करण्यात आली आहे. महसूल, कृषी, पुरवठा, बांधकाम, पाटबंधारे सह सर्वच शासकीय विभागाच्या अधिका-यांना कामावर लावण्यात आले आहे. लोकसभेच्या निवडणूका आता फक्त सहा महिण्यावर आली आहे. त्यामुळे निव्वळ झांगरा पाडण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. वास्तविक यवतमाळ जिल्हयात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. येलो मोझॅक रोगामुळे सोयाबिन चे प्रचंड नुकसान झाले. असे असले तरी पिक विमा कंपण्या गंभीरतेने घ्यायला तयार नाही. त्यामुळे एकीकडे शेतकरी मोठया प्रमाणात आत्महत्या करीत आहे तर सरकार मात्र सरकार आपल्या दारी कार्यक्रम घेऊन गरज नसलेल्या कार्यक्रमावर कोटयवधी रुपये खर्च करीत आहे. वास्तविक हीच रक्कम फालतु खर्च न करता शेतक-यांना वाटली असती तर काही शेतक-यांचे तरी भले झाले असते अशी टिका सुध्दा सिकंदर शहा यांनी केली आहे.
शेत मालाला भाव द्यायला दारात या
शेतक-यांच्या मालाला भाव नाही. बेरोजगांराना नोकरी नाही. महागाई प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकरी तसेच नागरीकांना दिलासा द्यायचा असेल तर सरकारने शेतीमालाला भाव देण्यासाठी, बेरोजगाराला नोकरी देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरीकांना न्याय देण्यासाठी दारात यावे. जी सेवा पन्नास रुपयात सेतु केन्द्रावर उपलब्ध आहे त्याकरीता कोटयवधी रुपये खर्च करुन आपल्या अकलेचा उजेड पाडू नये अशी खरमरीत टिका सुध्दा सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे.