शिरपूर शिवारात विजेच्या धक्क्याने बैलजोडीचा मृत्यू
एक बैल जखमी; शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान
वणी:- शेतात बैल चारायला नेत असताना वीजप्रवाह सुरू असलेल्या तारांचा स्पर्श होऊन बैलजोडीचा मृत्यू झाला. ही घटना शिरपूर शिवारात घडली. एक बैलही जखमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
तालुक्यातील शिरपूर-नवेगाव रोडच्या कडेला अनेक दिवसांपासून विजेची तार लोंबकळत पडली आहे. याची माहिती पोलिस पाटील सुवर्णा बोंडे यांनी शिरपूरचे वीज महावितरणच्या अधिकाऱ्याला दिली होती. मात्र ती तार मृत असल्याचे सांगून वीज महावितरणने ती तार काढण्यास चालढकल केली. सोमवारी सकाळी उमेश बोंडे यांचा सालगडी शेतात बैल नैत असताना बैलाचा तारांना स्पर्श झाला व दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक बैल जखमी झाला. त्यामुळे उमेश बोंडे यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची सूचना वीज महावितरण कंपनीला देण्यात आली आहे. शिवाय पोलिसांतही तक्रार नोंदविली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.