डेंग्यूला आळा घालण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
डेंग्यूला आळा घालण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
यवतमाळ – डेंग्यूला आळा घालण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे आवश्यक आहे. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून नागरिकांनी देखील एक दिवस कोरडा दिवस पाळून यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळा सुरु झाला की हिवताप, डेंग्यू, चिकुणगुनिया व इतर किटकजन्य आजारमध्ये वाढ होते. याला आळा घालण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे हाच एकमेव उपाय आहे. यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून जिल्ह्यात यावर्षी जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत डेंग्यू आजाराचे एकुण १२२ रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत ६७२ डेंग्यू रुग्ण्यांची नोंद झाली होती.
डासामुळे विविध आजार होऊ शकतात या पार्श्वभूमिवर नगर पालिका मुख्याधिकारी व जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महाविद्यालये व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डेंग्यू व हिवताप आजाराबाबत माहिती मिळावी यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. नगर परीषद अंतर्गत किटकजन्य प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत जिल्हा हिवताप अधिकारी यांनी संबंधितांना प्रशिक्षण दिले.
शहरी भागात डासअळी सर्व्हेक्षण केल्या जात आहे. ज्या घरी भांडी, टाकी व इतर टाकाऊ वस्तूमध्ये डासअळी आढळुन आलेली आहे, अशी भांडी रिकामी करणे व जी भांडी रिकामी करणे योग्य नाही अशा भांड्यात टेमिफॉसचे द्रावण टाकुन डासअळी नष्ट करण्यात येत आहे. यवतमाळ नगर परीषद अंतर्गत राबवित असलेल्या किटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्व्हेक्षणाच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व नगर परीषद शहरी भागात राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहे. त्याप्रमाणे सर्वेक्षण केले जात आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एडिस डासांचे उत्पत्ती स्थाने रांजण, टाके, माठ, कुलरमधील पाणी इत्यादी रिकामी करावीत. रिकामी न करण्याज्या भांड्यामधील पाण्यात टेमिफॉस द्रावणाचा वापर करावा. आठवड्यातील एक निश्चित दिवस कोरडा दिवस म्हणू पाळावा. त्याचप्रमाणे डासांपासून संरक्षण होण्या योग्य कापडांचा वापर करावा. लक्षणे आढळल्यास सरकारी दवाखाण्यामध्ये जाऊन त्वरीत वैद्यकीय सल्ला व उपचार करावेत
डेंग्यू तापाचा प्रसार हा एडिस डासाच्या मादीमार्फत होतो. या डासांची उत्पत्ती साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. डासोत्पत्ती रोखण्यासाठी व आजाराच्या प्रतिबंधासाठी टायर, फुटके कॅन, डबे यांची योग्यरितीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, वापरातील पाण्याची भांडी झाकून ठेवणे. साचलेली डबकी वाहती करणे, बुजवणे, घराच्या खिडक्यांना डास विरोधी जाळ्या बसविणे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावणे, घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करुन घासुन, पुसून, स्वच्छ करून कोरडा दिवस पाळणे, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करणे, पुर्ण बाह्यांचे कपडे घालणे, संडासच्या व्हेंटपाईपला जाळी बसविणे, कायम स्वरुपी डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पीमासे सोडणे या उपाययोजना अंमलात आणावे, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.टी.ए.शेख यांनी कळविले आहे.