बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या
धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराजांना शिवसैनिकांचे साकडे
समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी उदय राठोड यांनी केली आहे. विशेष म्हणजे संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे याकरीता दारव्हा येथून मोटरसायकल रॅली काढून तीर्थक्षेत्र धामणगाव देव येथील भगवान मुंगसाजी माऊली यांच्या मुख्य दरबारामध्ये
महाआरती करून महात्मा मुंगसाजी माऊली यांना संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे यासाठी मंदीरात जाऊन साकडे घातले आहे
संजय राठोड हे गेल्या तीस वर्षापासून सामाजिक तसेच शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या वीस वर्षापासून ते दिग्रस विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे.
त्यांनी युती सरकारमध्ये कॅबीनेट दर्जाचे मंत्रीपद भूषविले आहे. महसूल, अन्न औषधी प्रशासन, जलसंधारण, वन यासह अनेक खाती त्यांनी सांभाळली आहे. बंजारा समाजात त्यांना मानाचे स्थान असून राज्यभर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
बंजारा समाजाची काशीस मजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे त्यांनी प्रयत्न करुन भव्यदिव्य नंगारा भवन उभारले. संजय राठोड यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत माणिकराव ठाकरे यांचा पराभव करुन विजय मिळविला. आता ते मंत्रीपदाच्या शर्यतीत असून त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी करण्यात येत आहे.
बंजारा समाजातील वसंतराव नाईक तसेच सुधाकरराव नाईक यांनी यापुर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद भूषविले आहे. आता संजय राठोड यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी समस्त गोर बंजारा बांधवांकडून केली जात आहे. दारव्हा तालुक्यातील महागाव जिल्हा परिषद सर्कलचे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते उदय राठोड यांनी महायुतीकडे ही मागणी लाऊन धरली आहे.
महाराष्ट्रात मोठ्या संख्येत बंजारा समाज वास्तव्यास आहे. या समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित असून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे. संजय राठोड यांनी अनेक मागण्या पुर्ण केल्यामुळे बंजारा समाज नेहमी युतीच्या मागे राहिला आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी बंजारा समाजाची एकमुखी मागणी मान्य करून संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी होत आहे