January 16, 2025

यवतमाळ : बसस्थानक परिसरासह एसटी बसमधील प्रवासही आता धोक्याचा ठरत आहे. बॅगमध्ये ठेवलेला ऐवजही सुरक्षित नाही. अंगावरचा दागिना चारचौघात हिसकावून नेला जातो. त्याप्रमाणेच बॅगमध्ये ठेवलेले दागिनेही कधी उडविले जातील याचा नेम नाही. अमरावती येथे लग्नसोहळा आटोपून घाटंजी येथे परत जात असताना शिक्षिकेचे बॅगमधून ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञातांनी लंपास केले. ही घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता घडली.

अस्मिता दादाराव शेंडे (रा. वसंतनगर, घाटंजी) या समर्थ हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्या पती व मुलांसह ७ डिसेंबर रोजी अमरावती येथे नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी सोबत सोन्याचे दागिने घेतले. लग्नसोहळा आटोपून त्या अमरावती येथून यवतमाळ येथे १२ डिसेंबर रोजी परत आल्या. यवतमाळ बसस्थानकावरून यवतमाळ-मांडवी या नॉनस्टॉप गाडीमध्ये बसल्या. बस शहराच्या बाहेर वंदे मातरम् चौक परिसरात आली. त्यावेळी पांढरी जाण्यासाठी चढलेले दोन प्रवासी भोसा
वंदे मातरम चौक येथे उतरले. त्यांनी उतरताना ही बॅग कुणाची आहे, असे विचारले. त्यावरून अस्मिता शेंडे यांना संशय आला. त्यांनी बॅग तपासली असता तिची चेन उघडी दिसली. मात्र, तोपर्यंत बस तेथून पुढे निघाली होती. बॅगमध्ये ठेवलेली दागिने असलेली पर्स आढळून आली नाही. त्यामध्ये ३२ ग्रॅम ९०० मिलीचे सोन्याचे मंगळसूत्र व ३५ ग्रॅम वजनाचा दोन पदरी चपलाकंठी हार होता. दागिने चोरी गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर अस्मिता शेंडे यांनी अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितेप्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अवधुतवाडी पोलिस करीत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *