गॅस सिलेंडरचा स्फोट ; दोन घराला लागली आग
जवळपास ३ लाखांचे नुकसान
सुदैवाने जीवितहानी टळली
दिग्रस देव नगर येथील घटना.
दिग्रस देव नगर येथील एका घरातील गॅस सिलेंडर चिरल्याने मोठा स्फोट होऊन दोन घरातील सर्वच जीवनावश्यक व अत्यावश्यक साहित्य जळून खाक जवळपास ३ लाखांचे नुकसान झाल्याची घटना ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने जीवितहानी टळली.
सविस्तर वृत्त असे की, दिग्रस देव नगर स्थित असलेल्या अशोक मंगल सडमाके (वय -५०) यांच्या घरी गॅस सिलेंडर शेगडीवर पाणी गरम करीत असताना गॅस चिरल्याने मोठ्या स्फोट झाला. या स्फोटाची झळ घरालगत असलेल्या लक्ष्मण जंगलूजी सडमाके (वय -५२) रा.देवनगर दिग्रस यांच्या दोन्ही घरातील टीव्ही, कुलर, पंखे, फ्रीज, सायकल, मोबाईल, चार्जर, कपडे, होम थेटर, भाडे कुंडी, टिनपत्रे, पाण्याच्या टाक्यासह, प्लास्टिक, लाकडी साहित्य, कपडे लत्ते, गादी, घरातील धान्य सह घरात ठेवलेले नगदी अंदाजे साडे चार हजार रुपये व वस्तू जळून खाक झाल्याने जवळपास ३ लाखाचे नुकसान झाले आहे. गॅसला आग लागली तेव्हा दोन्ही घरातील मंडळींनी घराबाहेर पळ काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
आग लागताच मुख्याधिकारी डॉ.अतुल पंत यांना संपर्क केला असता तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तेव्हा अग्निशमन दलाचे आश्विन इंगळे, सागर शेळके, अब्दुल नासिर, सहदेव उघडे यांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीत सर्व साहित्याची राख झाली होती. या घटनेचा पंचनामा तहसीलदार मयूर राऊत यांच्या आदेशाने तलाठी प्रणिश दुधे सह कर्मचाऱ्यांनी केला. या आगीत झालेल्या सर्व अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने दोन्ही परिवार बेघर झाले असून अंगावरील कपडे फक्त त्यांचे शिल्लक राहिले असून शासनाने व सामाजिक संघटनेने त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे घर पुन्हा उभे होऊन संसार सुरळीत व्हावा यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी बेघर झालेल्या कुटुंबांनी आर्त हाक दिली आहे.