आर्णी तालुक्यातील शक्तिपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी पूर्ण.
आर्णी तालुक्यातील शक्तिपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी पूर्ण.
यवतमाळ – शक्तीपीठ महामार्गाच्या कामास शासनाद्वारे सुरुवात करण्यात आली आहे. या महामार्गासाठी आर्णी तालुक्यातील संयुक्त मोजणी पुर्ण झाली आहे.
शक्तिपीठ महामार्ग एकूण ८०२ किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी या महामार्गाची १३७ किलोमीटर एवढी लांबी यवतमाळ जिल्ह्यातून जाते. त्यात यवतमाळ तालुक्यातून २७ किलोमीटर व आर्णी तालुक्यातील ३४ किलोमीटर एवढी लांबी आहे. यवतमाळ उपविभागातील आर्णी तालुक्यामध्ये एकूण १६ गावांमधून शक्तिपीठ महामार्गाकरिता भूसंपादन करण्यात येणार आहे.
आर्णी तालुक्यातील लोणबेळ येथून १६ एप्रिल रोजी शक्तिपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरुवात करण्यात आली होती. दि.२८ एप्रिल रोजी या १६ गावांमधील मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संयुक्त मोजणी प्रक्रिया दरम्यान महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग असे विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मोजणी प्रक्रियेसाठी आर्णी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहकार्य केल्यामुळे लवकरात लवकर संयुक्त मोजणी प्रक्रिया पार पाडणे शक्य झाले. उपविभागीय अधिकारी यवतमाळच्या अंतर्गत असलेल्या यवतमाळ तालुक्यातील संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू असून दिनांक 28 मे पर्यंत मोजणी प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी कळविले आहे.