##पणती## शब्दरचना पराग पिंगळे यवतमाळ

##पणती##
अंधार विचारतोय पृथ्वीला
आता कोण तुझी काळजी घेईल?
अस्ताला जातोय सूर्य तो
आता उद्यालाच तो परत येईल ।।
चंद्र,तारे म्हणतात आहे
आम्हास कुठे सूर्याचे तेज ?
व्यापून टाकाया पृथ्वीला
नाहीच आम्ही तरबेज ।।
अस्ताला जाणारा सूर्यही
मनोमन पार हिरमुसला ,
कोणीच पुढे येईना म्हणून
मनोमन तो पण रुसला ।।
तितक्यात एक पणती आली
आणि म्हणाली थेट पृथ्वीला,
काळजी करू नकोस तू
मी आहे अंधार संपवायला ।।
पणती म्हणाली आवेशाने
मी स्वतःला संपवून घेईन,
पण नकारात्मक अंधाराला
मी तुझ्यापासून दूर ठेवील ।।
पणती म्हणे माहितीय माझी
शक्ती थोडी कमी असेल,
पण समाधान ह्याचेच की
माझ्या परिघात अंधार नसेल ।।
प्रत्येक पणतीने जर ठरवले
आपली जबाबदारी घ्यायला,
अंधाराचा पराभव शक्य आहे
गरज आहे कोणीतरी पुढे यायला ।।
समाजाचे सुद्धा असेच आहे
जर कोणी स्वतः पुढाकार घेईल,
संपेल अंधार नाकर्तेपणाचा
जर कोणीतरी ती पणती होईल ।।