October 30, 2024

नाताळ (ख्रिसमस) साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सुचना

 

यवतमाळ, दि. 25 : कोविड – 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नाताळ सण (ख्रिसमस) साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना यवतमाळ जिह्याकरीता खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे.

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पध्दतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल, याची काळजी घ्यावी. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री इतर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने / स्टॉल लावण्यात येऊ नयेत.

 

60 वर्षांवरील नागरिकांना तसेच 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे व सण घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात येऊ नये. 31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7 वाजता किंवा त्यापुर्वी घेण्याचे नियोजन करावे.

कोविड – 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत नगर परिषद / नगर पंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed