संतप्त शेतकरी विधवांनी कंगना रनौतचा पुतळा जाळला

शेतक-यांना आतंकवादी संबोधल्याने संताप

प्रतिनिधी यवतमाळ:- हिंदी चित्रपट सृष्टीतिल अभिनेत्री कंगना रनौत हिने पुन्हा एकदा शेतक-यांना आतंकवादी संबोधल्याने शेतक-यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान आज पांढरकवडा येथे शेतकरी विधवांनी कंगना रनौतचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे यापुढे सर्वच शेतकरी कंगना रनौत च्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.

“हो आम्ही शेतकरी आहोत पण आम्ही अतिरेकी नाही” हे आंदोलन आज पांढरकवडा येथे करण्यात आले. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्हयातील मोठया प्रमाणात शेतकरी विधवा नुकतेच दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तसेच शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाऊन आल्या. आता मात्र या आंदोलनात सहभागी झालेले सर्वच शेतकरी आतंकवादी असल्याचे वक्तव्य कंगना रनौत यांनी केले आहे. हा शेतक-यांचा अपमान असल्यामुळे आज पांढरकवडा येथे कंगनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यानंतर कंगनाचा पुतळा जाळून तिचा निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे कंगनाच्या चित्रपटांवर यापुढे बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे सुध्दा स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी शेतकरी नेते किशोर तिवारी, समाजसेवक स्मिता तिवारी, शेतकरी विधवा भारती पवार, पौर्णिमा कोपुलवार, कविता सिद्म, लक्ष्मी गिरीवार, राम थमके, वंदना मोहर्ले, रेखा गुरनाळे, अपर्णा मलिकर, योगिता चौधरी आणि शेतकर्यांचे नेतृत्व माजी नगरपालिका अध्यक्ष अनिल तिवारी, अंकित नैताम, सुनील राऊत, सुरेश तलमले, निलेश जयस्वाल, मनोज चव्हाण, संदीप जाजुलवार, चंदन जैनकर, प्रदीप कोसरे, बबलू धुर्वे, आशुतोष अंबाडे उपस्थित होते. यावेळी शेतकरी विधवा भारती पवार म्हणाल्या, “आम्ही आमच्या डोळयाने पोलिस आणि निमलष्करी दलांचे अत्याचार बघितले आहेत. आर्थीक दृष्टया खचलेला शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आनखी खचत चाललेला आहे. शेतकरी विधवा कविता सीडम म्हणाल्या की कंगना रनौत यांच्या विधानामुळे आपल्या सर्वांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो शेतक-यांनी आत्महत्या केली. माझ्या पतीने सुध्दा कर्जामुळे जीव गमावला. असे असतांना आम्हाला आतंकवादी ठरविल्या जात आहे. हा शेतक-यांच्या बलिदानाचा सन्मान आहे काय असा प्रश्न सुध्दा तिने उपस्थित केला.

 

संपात सहभागी व्हा

अत्याचारी शेतकरी कायद्याच्या विरोधात दिनांक 6 फेब्रुवारी रोजी विविध शेतकरी संघटनांची भारत बंद पुकारला आहे. या बंद मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेसह अनेक राजकीय तसेच सामाजिक संघटना सहभागी होत आहे. नागरीकांनी या दिवशी दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडू नये. नागरीकांनी या संपात सहभागी होऊन शेतक-यांना समर्थन देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *