राम नामाच्या गजरात रामनवमीला निघणार भव्यदिव्य शोभायात्रा

——————————————————————
                  प्रमुख आकर्षण
प्रस्तावित राममंदिराची प्रतिकृती.
          केरळचे पारंपरिक वाद्य संच.
          सामाजिक व धार्मिक विषयावरील झाँकी

प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीनं रामनवमीनिमित्त रविवार दिनांक १० एप्रिल रोजी यवतमाळ शहरात रामनामाच्या भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ च्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी रामनवमी शोभायात्रा गेली दोन वर्ष कोरोना परिस्थितीत असलेल्या निर्बंधांच्या कारणामुळे आयोजित झाली नाही. मात्र यावर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे रामनवमी शोभायात्रा आकर्षक आणि आदर्शवत अशीच होईल यादृष्टीने श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समिती झटत आहे. जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरातून श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींचे विधिवत पूजन होऊन या शोभायात्रेला दुपारी ४ वाजता प्रारंभ होईल. यंदा नवीन कलाकृतीसह साकारण्यात येणाऱ्या आकर्षक अशा सुशोभित रथामध्ये हा रामदरबार विराजित असणार आहे. स्थानिक कलावंत पिंटू पिंपळकर हे हा रामरथ साकारत आहे. हा रामरथ रामभक्तांद्वारे शोभायात्रा मार्गावर हाताने ओढण्यात येणार आहे. महिला पुरुष आबालवृद्धांच्या या सर्वसमावेशक शोभायात्रेचे यंदाचे मुख्य आकर्षण रामजन्मभूमी अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्रस्तावित राममंदिराची प्रतिकृती असून ती १२ फूट उंच व १८ फूट लांब असणार आहे. ही प्रतिकृती स्थानिक कलावंत प्रसाद कळंबे हे साकारत आहेत. याशिवाय केरळ येथील २३ कलावंतांचा संच पारंपारिक वाद्य सादर करणार असून हिंदू देवीदेवतांच्या साक्षात वाटणाऱ्या वेशभूषेत कलेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच प्रख्यात मूर्ती कलावंत सचिन मानेकर ह्यांनी साकारलेल्या प्रभू श्रीराम व हनुमानाच्या दहा फूट उंच मूर्ती शोभायात्रेचे आकर्षण असणार आहे. सोबत नस्करी पार्डी येथील ५० जणांचे भजनी मंडळी, डेंटल डॉक्टर्स असोसिएशन ची व्यसनमुक्ती या विषयावरील झाँकी सोबतच शहराच्या विविध भागातून धार्मिक, ऐतिहासिक विषयावरील आणि सामाजिक प्रबोधन करणाऱ्या झाँक्या व चलचित्र देखावे या शोभायात्रेत सहभागी होतील. वारकरी संप्रदाय भजन मंडळींचे पथक, जिल्ह्यातील आदिवासी दंडार नृत्य, डफडी, व्यायामशाळा व आखाड्यांमधील बंदाट्या याद्वारे प्राचीन आदिवासी संस्कृतीची झलक बघायला मिळणार आहे. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी, भगवे ध्वज, पताका लावण्यात येणार असून भजनगायनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. रामभक्तीमय वातावरणात निघणाऱ्या या शोभायात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी यवतमाळकरांनी केली असून शहरात श्रीरामांच्या प्रतिमा आणि फलक झळकत आहेत. शिवाय अनेक चौकात सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. पारंपारिक मार्गावरून आयोजित शोभायात्रेच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून सुरक्षा समितीत बजरंग दलाच्या ५०० सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. जयहिंद चौक श्रीराममंदिरातून सुरु होणाऱ्या शोभायात्रेचे समापन संत सेना चौकात महाआरती नंतर होणार आहे. यावेळी उत्कृष्ट चित्ररथ व झाँकीला पारितोषिक वितरण करण्यात येईल. यवतमाळकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीने केले आहे.


————————————————————————–
                      मोटारसायकल प्रभात फेरी.

रामनवमी निमित्त रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने मोटारसायकल प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त मंदीर, दत्त चौक येथून या मोटारसायकल रैलीला सकाळी ७ वाजता सुरवात होईल. शहराच्या विविध भागातून श्रीरामनामाची धून वाजवत आयोजित होणाऱ्या या प्रभातफेरीचे समापन जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरात होईल.
————————————————————————-                         उत्कृष्ट देखाव्यांना पारितोषिक.

यवतमाळचे सांस्कृतिक वैभव वाढविणारा लोकोत्सव असे स्वरूप श्री रामजन्मोत्सव शोभायात्रेला आले असून यात सहभागी होणाऱ्या झाँक्या, चित्ररथ याद्वारे पौराणिक घटनांना उजाळा व सामाजिक प्रबोधन केल्या जाते. त्यामुळे शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या सामाजिक विषयावरील देखावा, जीवंत कलाकृती, आणि मूर्तीकला या घटकात भरघोस बक्षिस समितीच्या वतीने देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *